ऑस्ट्रेलियामध्ये एका व्यक्तीने स्वत:च्या पत्नीला वाचवण्यासाठी साह फूटांहून अधिक मोठ्या आकाराच्या ग्रेट व्हाइट शार्कवर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे अनपेक्षितपणे झालेल्या या हल्ल्यामुळे शार्कच्या जबड्यातून या महिलेची सुटका झाली. या महिलेला किरकोळ जखमा झाल्या असून पतीने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे तिचे प्राण वाचले आहेत. रॉयटर्सने वेगवेगळ्या स्थानिक वृत्तापत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकार ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्सच्या पोर्ट मॅक्युरी येथे शनिवारी (१५ ऑगस्ट २०२० रोजी) घडला. द सिडनी मॉर्नींग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार ३५ वर्षीय चॅण्टीली डोएली ही समुद्रामध्ये आपल्या पतीबरोबर सर्फींगचा आनंद घेत होती. त्याचवेळी शेली बीचजवळ एका २ ते ३ मीटर (साडेसहा ते दहा फूट) लांबीच्या शार्कने तिच्यावर हल्ला केली. या शार्कने महिलेच्या उजव्या पायावर हल्ला केला. पत्नीवर शार्कने हल्ला केल्याचे पाहताच तिच्या पतीने सर्फबोर्डवरुन उतरुन थेट शार्कवर उडी मारली आणि शार्कच्या डोळ्यांवरील भागावर बुक्क्या मारु लागला. या सर्व घटनेचे साक्षीदार असणाऱ्या सर्फ लाइफ सेव्हिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह पॅकर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. “त्यांनी स्वत:च्या सर्फ बोर्डवरुन खाली उडी मारत शार्कवर उडी मारली. त्यानंतर तोपर्यंत शर्कने महिलेचा पाय सोडला नाही तोपर्यंत ते तिच्यावर हाताने वार करत होते. अखेर शार्कने महिलेचा पाय जबड्यातून सोडल्यानंतर ते त्या महिलेला समुद्रकिनारी घेऊन आले. हे खूपच थरारक पण साहसी होतं,” असं पॅकर यांनी सांगितलं.

द हेलार्डने महिलेवर समुद्रकिनाऱ्यावर प्राथमोपचार करण्यात आल्याचे म्हटले आहे. त्यानंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.

या घटनेनंतर पोर्ट मॅक्युरी परिसरातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. या समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेशी संबंधित जबाबदारी असणाऱ्या सर्फ लाइफ सेव्हिंग एनएसडब्ल्यू या कंपनीने यासंदर्भातील एक पत्रक जारी करुन समुद्रकिनाऱ्यांवर प्रवेश देण्यात येणार नसल्याचे म्हटलं आहे. तसेच ज्या भागांमध्ये शार्कचा वावर दिसून आला आहे तिथे विशेष लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही या पत्रकात म्हटलं आहे.