ब्राझीलमधील अॅमेझॉनच्या घनदाट जंगलात राहणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडियो नुकताच समोर आला आहे. हा व्यक्ती मागील २२ वर्षांपासून एकटाच या जंगलात राहत असल्याचे म्हटले जात आहे. ब्राझीलमधील एका सरकारी एजन्सीने हा व्हिडियो प्रसिद्ध केला आहे. पर्यावरण सुरक्षा यंत्रणेच्या म्हणण्यानुसार, या व्यक्तीची सुरक्षा आणि गोपनियता राखण्यासाठी त्याला कोणताही संपर्क न करता त्याच्यावर नजर ठेवण्यात येत आहे. आता समोर आलेल्या व्हिडियोमध्ये हा व्यक्ती झाडाच्या फांद्या कापताना दिसत आहे. व्हिडियोमध्ये कुऱ्हाडीने झाडावर मारण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज व्यवस्थित ऐकू येत आहे. मात्र झाडाच्या पानांमुळे त्याचा चेहरा दिसत नाही.

दुसऱ्या एका व्हिडियोमध्ये जंगलात तयार करण्यात आलेली झोपडीही दिसत आहे. हा व्यक्ती या झोपडीत राहतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ब्राझीलमधील एका सरकारी एजन्सीकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आधी हा व्यक्ती रोंडोनिया राज्यातील जंगलात एकटाच राहताना सापडला होता. असे म्हटले जाते की त्याच्या जातीचे त्याच्यासोबत राहणारे काही जण १९९५ ते ९६ च्या दरम्यान शेतकऱ्यांकडून केल्या गेलेल्या हल्ल्यात मृत्यू पावले. फाऊंडेशनच्या सदस्यांनी त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला बाहेरील जगाशी जोडून घ्यायचे नसल्याचे समजले. आता हा व्यक्ती नेमका कोण आहे? त्याचे नाव काय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. तो विशिष्ट जातीचा शेवटचा व्यक्ती आहे असेही म्हटले जात आहे. व्हिडियोमध्ये दिसणाऱ्या या व्यक्तीचे वय ५५ ते ६० असल्याचे म्हटले जात आहे.