गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी बायकोला घरात कुलूप लावून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अहमदाबादच्या रायपूर भागात सोमवारी ही घटना घाडली. ४० वर्षीय पीडित महिलेने खादीया पोलीस स्टेशनमध्ये सोमवारी पतीविरोधात तक्रार नोंदवली आहे. जवळपास तासभर ही महिला घरामध्ये बंद होती. तिचा आरडाओरडा ऐकून रस्त्यावरुन जाणाऱ्या एका वाटसरुने तिची सुटका केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

१६ वर्षांपूर्वी कुटुंबियांच्या इच्छेनुसार मी लग्न केले. तेव्हापासून मला त्रास दिला जातोय असे या महिलेने एफआयआरमध्ये म्हटले आहे. या जोडप्याला दोन मुली आहेत. रविवारी संध्यााकाळी नवरा चांगले कपडे घालून तयार होत होता. त्यावेळी तो त्याच्या गर्लफ्रेंडला भेटायला चाललाय हे त्या महिलेला समजले. मागच्या तीन वर्षांपासून त्याचे बाहेर प्रेमसंबंध आहेत.

तिने यावर आक्षेप घेत नवऱ्याला जाब विचारला. पण त्याने तिच्याकडे दुर्लक्ष केले व तिला घरात बंद केले व निघून गेला.रायपूर भागात या जोडप्याचे दोन मजली घर आहे. महिला घराच्या खिडकीत उभी राहून मदतीसाठी याचना करत होती. अखेर एका वाटसरुने लॉक तोडले व तिची मुक्तता केली. त्यानंतर पत्नी थेट मणिनगरमध्ये त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन धडकली. तिथे दोघेही एकत्र होते. महिलेने थेट मणिनगर पोलीस स्टेशन गाठले.

तिला पोलिसांनी खादीया पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास सांगितले. तिने पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. पतीच्या दुसऱ्या महिलेबरोबर असलेल्या संबंधांवर आक्षेप घेतला म्हणून नवरा आपला छळ करतो असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आपण दोन मुलींना जन्म दिला हे सुद्धा त्रास देण्यामागचे एक कारण असल्याचा महिलेचा आरोप आहे. खादीया पोलिसांनी महिलेने केलेल्या आरोपांची चौकशी सुरु केली आहे.