तो प्रेमात पडला आणि त्यानंतर त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र फरक इतकाच होता की त्याने एकाचवेळी दोन जणींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे एकाच दिवशी एकाच कार्यक्रमामध्ये त्याने जवळचे नातेवाईक आणि मित्र परिवाराच्या उपस्थित त्या दोघींशी एकाचवेळी लग्नगाठ बांधली. पाच जानेवारी हा आगळावेगळा विवाहसोहळा पार पडला छत्तीसगडमधील बत्सरमध्ये. या लग्नाला ५०० वऱ्हाडी उपस्थित होते. या लग्नानंतर लग्नातील व्हिडीओ, फोटो आणि लग्न पत्रिका सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. तर एकाच वेळी दोन्ही प्रेयसींसोबत लग्न करणाऱ्या या व्यक्तीचं नाव आहे चंदू मौर्या.
या जगावेगळ्या लग्नाची संपूर्ण गोष्ट समजून घेण्यासाठी तीन वर्ष मागे जावं लागेल. शेतकरी कुटुंबातून असणारा चंदू आणि त्याचे कुटुंब नक्षलग्रस्त बस्तर जिल्ह्यातील एका दूर्गम भागातील ताकरालोहांगा गावामध्ये राहतं. तीन वर्षांपूर्वी २४ वर्षीय चंदू हा टोकापल परिसरामध्ये वीजेच्या खांबाचं काम करण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याची भेट २१ वर्षीय सुंदरी काश्यप नावाच्या मुलीशी झाली आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर ते मागील तीन वर्षांपासून फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात होते आणि अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय़ घेतला.
सुंदरीच्या प्रेमात पडल्यानंतर अंदाजे एका वर्षानी चंदूला पुन्हा प्रेम झालं. २० वर्षीय हसीना बाघेल ही चंदूच्या गावातील एका लग्नसमारंभासाठी आली असता चंदूने तिला पाहिलं आणि तो हसीनाच्या प्रेमात पडला. हसीनाही चंदूच्या प्रेमात पडली. हसीनानेच तिच्या प्रेमाची कबुली दिली तेव्हा चंदूने तिच्यापासून काहीही न लपवता आपण आधीपासूनच एका मुलीवर प्रेम करतो असं तिला स्पष्टपणे सांगितलं. तरी हसीनाने आपण फोनवरुन संपर्कात राहूयात असं चंदूला सांगितलं.
“हसीना आणि सुंदरी दोघींनाही एकमेकींबद्दल समजलं. त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत असणारं नातं कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आम्ही फोनवरुन एकमेकांच्या संपर्कात होतो. मात्र अचानक एक दिवस हसीना माझ्या घरी आली आणि इथेच राहणार असं सांगू लागली. सुंदरीला हे समजल्यानंतरही ती सुद्धा माझ्या घरी आहे. तेव्हापासून आम्ही एकाच घरात एका कुटुंबाप्रमाणे राहतो,” असं चंदूने हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितलं. चंदूच्या घरात या दोघांसोबतच त्याचे आई वडील आणि दोन भावंड राहतात.
काही महिन्यानंतर लग्न न करताच दोन महिलांसोबत राहणाऱ्या चंदूच्या या लिव्ह इनमध्ये राहण्याच्या निर्णयाचा गावकरी तसेच घरचेही आक्षेप घेऊ लागले. त्याच वेळी चंदूने दोघींसोबत एकाच दिवशी एकाच मंडपात लग्न करण्याचा निर्णय घेतला. “सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्ननांना कंटाळून मी दोघींशी लग्न करण्याचा निर्णय घेतला कारण दोघीही माझ्यावर प्रेम करतात. मी त्यांची फसवणूक करु शकत नाही. त्या दोघींनीही या लग्नाला संमती दिल्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला,” असं चंदू म्हणाला.
हसीनाच्या घरची मंडळी या लग्नाला उपस्थित होती. मात्र सुंदरीच्या घरच्यांनी या लग्नाला विरोध करत लग्नावर बहिष्कार टाकल्याने तिच्या घरुन या लग्नासाठी कोणीच आलं नव्हतं, असं चंदू सांगतो. आपले पालक तरी लग्नाला येतील अशी सुंदरीला अपे्क्षा होती. “माझे पालक आज माझ्या निर्णयावर समाधानी नाहीयत. मात्र परिस्थिती हळूहळू बदलेल. मी आणि हसीना दोघीही चंदूसोबत असल्याने आनंदी आहोत. मी आयुष्यभर त्याच्या सोबत राहणार आहे,” असं सुंदरी सांगते
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 8, 2021 8:34 am