भारताप्रमाणे जगभरातील अनेक देशांमध्येही करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. फ्रान्समध्येही 17 मार्चपासून लॉकडाउन आहे. केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठीच नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. असं असलं तरी इथेही लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांची कमी नाहीये. येथील एक व्यक्ती तर स्वस्त सिगारेट खरेदी करण्यासाठी थेट स्पेनला पोहोचल्याचं वृत्त आहे.

शनिवारी दक्षिण फ्रान्सच्या पेर्पिग्नन शहरातून एक व्यक्ती स्वस्त सिगारेट खरेदी करण्यासाठी थेट स्पेनच्या ला जोन्केरा शहरात पायपीट करत निघाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिले या व्यक्तीने कारने जाण्याचा प्रयत्न केला. पण त्याला चेकपॉइंटवर अडवण्यात आले. यानंतर त्याने दोन्ही देशांच्या सीमेलगत असलेल्या पायरेनीस पर्वतरांगांमधून पायी जाण्याचं ठरवलं.

पायरेनीस पर्वतरांगांमधून पायपीट करताना झाडाझुडपांमधून मार्ग काढत तो एका नदीच्या प्रवाहात पडला. आपण हरवलोय, रस्ता चुकलोय हे लक्षात आल्यानंतर मात्र या पठ्ठ्याने आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या बचाव कक्षाकडे फोन करुन मदत मागितली. तातडीने त्याच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवण्यात आले. त्याला पुन्हा पेर्पिग्नन शहरात आणल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर लॉकडाउनच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई केली. 145-युरो म्हणजे जवळपास 11 हजार रुपयांहून अधिक दंड आकारल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा घराबाहेर अजिबात न पडण्याची ताकीद देत सोडले. पण, त्याच्या नावाचा खुलासा पोलिसांनी केला नाही.

सामान्य परिस्थितीमध्ये दक्षिण फ्रान्समधील काही लोक स्वस्त सिगारेट, मद्य आणि पेट्रोल भरण्यासाठी स्पेनमध्ये जात असतात. पण, लॉकडाउनमुळे आता अनेक देशांनी बाहेरुन येणाऱ्या व्यक्तींसाठी आपल्या सीमा पूर्णपणे बंद केल्या आहेत.