आंध्र प्रदेशात एका व्यवसायिकाला कष्टाने जमवलेला पैसा गमवावा लागला आहे. कृष्णा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. व्यवसायिकाने आपला सगळा पैसा बँकेत न ठेवता एका ट्रंकमध्ये ठेवला होता. पण पैसा बँकेतच ठेवला असता तर जास्त बरं झालं असतं असं म्हणण्याची वेळ या व्यवसायिकावर आली आहे. कारण हा पैसा आता फक्त एका कागदाचा तुकडा राहिला आहे. ट्रंकमध्ये एकूण पाच लाख रुपये होते.

झालं असं की, वाळवी लागल्याने सर्व नोटा खराब झाल्या आहेत. व्यवसायिकाने ट्रंमध्ये ५०० आणि २०० च्या नोटा ठेवल्या होत्या. पण आता या नोटांचं बाजारमूल्य काहीच राहिलेलं नाही. या घटनेमुळे व्यवसायिकाला खूप मोठा धक्का आणि आयुष्यभराची शिकवण मिळाली आहे.

त्याचा डुकरांचा व्यवसाय असून सर्व व्यवहार रोख चालतो. यातून मिळणारा पैसा बँकेत न ठेवता तो ट्रंकमध्ये ठेवत होते. एकूण पाच लाख रुपये जमा करायचे आणि घर बांधायचं असं त्याचं स्वप्न होतं.

नोटा खराब झाल्याने त्याने त्या रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांमध्ये वाटले. नागरिकांनी जेव्हा मुलांच्या हातात इतके पैसे पाहिले तेव्हा त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी तपास केला असता सगळा प्रकार उघडकीस आला.