14 December 2017

News Flash

गर्लफ्रेंडबरोबर फिरायला पैसे नाहीत म्हणून हायजॅकिंगचा घाट!

हैदराबादच्या 'बुध्दिमान' माणसाची कहाणी

लोकसत्ता आॅनलाईन | Updated: April 21, 2017 3:49 PM

प्रातिनिधिक छायाचित्र.

काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांना एक ईमेल आला. त्यात लिहिलं होतं की मुंबई, चेन्नई आणि हैदराबाद या तीन विमानतळांवर २३ जणं विमान हायजॅक करणार आहेत. झालं! मुंबई पोलिसांनी सगळ्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट करून मुंबई विमानतळावर तपास मोहीम हाती घेतली. चेन्नई आणि हैदराबाद विमानतळांनाही संदेश गेले. तिथेही धावपळ सुरू झाली. या तिन्ही विमानतळांची कसून तपासणी केल्यावरही हातात काहीच लागलं नाही. कुठे काही संशयास्पद हालचालही दिसली नाही. त्यावेळी मुंबई पोलिसांनी त्या ईमेलकडे मोहरा वळवला. ही ईमेल हैदराबादवरून पाठवण्यात आल्याचं निष्पन्न झाल्यावर आयपी अॅड्रेसने पोलिसांनी हा ई मेल पाठवणाऱ्या व्यक्तीला शोधून काढत त्याला बेड्या ठोकल्या. ही ईमेल त्याने का पाठवली याचं कारण कळताच पोलिसांनी डोक्याला हात लावला असेल.

ही ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचं नाव होतं वामसी कृष्णा. हैदराबादला राहणाऱ्या कृष्णाची गर्लफ्रेंड चेन्नईमध्ये आहे. आपण दोघे एकत्र फिरायला जाऊ असा त्याच्याकडे त्याच्या गर्लफ्रेंडने लकडा लावला. तिला गोवा आणि मुंबईला फिरायला जायचं होतं. पण या पठ्ठ्याकडे त्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला (आपल्याकडे पैसे नाहीत हे न सांगता) समजावून पाहिलं पण ती ऐकत नव्हती. शेवटी त्याने काँप्युटरवर खोटी विमान तिकीटं तयार करून तिला पाठवली आणि काहीवेळापुरतं हे प्रकरण थांबलं.

पण जायची वेळ जवळ आली तसतशी कृष्णाची परिस्थिती पुन्हा बिकट झाली. आता खोटी तिकिटं घेऊन विमानतळावर गेलं तर विमानात बसायला मिळणार नव्हतं. मग त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला पुन्हा मूर्ख बनवायला ‘सॉल्लिड’ शक्कल लढवली.

आपण ज्या विमानाने जाणार आहोच ती फ्लाईटच कॅन्सल झाली तर परस्पर ब्याद टळेल असा विचार करत त्याने मुंबई पोलिसांना (रीतसर) ई- मेल करत हे विमान हायजॅक होणार असल्याचं आणि त्याला हैदराबाद, चेन्नई आणि मुंबईच्या विमानतळावर २३ जणांचा एक गट जबाबदार असल्याचं सांगितलं. म्हणजे तपासणीच्या निमित्ताने हे विमान कॅन्सल होईल आणि आपला बनाव उघड होणार नाही. असा या डोकेबाजाच्या मनात आलं. सध्या त्याच्यावर दोन कलमांखाली गुन्हा दाखल आहे. आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे.

First Published on April 21, 2017 2:48 pm

Web Title: man sends fake plane hijacking email to cops to avoid girlfriend