वैद्यकीय क्षेत्रामध्ये अनेकदा डॉक्टरांनाही गोंधळात टाकणारी प्रकरण समोर येत असतात. असच एक प्रकरण ब्राझीलमध्ये समोर आलं आहे. पाठदुखीचा त्रास होतो म्हणून डॉक्टरकडे तपासणीसाठी गेलेल्या एका रुग्णाला मोठा धक्काच बसला जेव्हा डॉक्टरांनी त्याला त्याच्या पाठदुखीचे खरे कारण सांगितले. तुम्हाला दोन नसून तीन किडन्या आहेत असं डॉक्टरांनी सांगितल्यानंतर या व्यक्तीचा विश्वासच बसत नव्हता अखेर डॉक्टरांनी त्याला सीटी स्कॅन रिपोर्ट दाखवल्यानंतर त्याचा यावर विश्वास बसला. या आगळ्यावेगळ्या प्रकरणासंदर्भातील अहवाल ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’मध्ये छापून आला आहे.

ब्राझीलमधील सॅओ पाओलो येथील एका व्यक्तीच्या पाठीमध्ये वेदना होऊ लागल्याने तो तपासणीसाठी डू रीम रुग्णालयामध्ये गेला. तेथे डॉक्टरांनी पाठीचे सीटी स्कॅन करण्याचा सल्ला या व्यक्तीला दिला. डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे या ३८ वर्षीय व्यक्तीने लगेच सीटी स्कॅन करुन घेतले. सीटी स्कॅनमध्ये या व्यक्तीला स्लिप डिस्कचा त्रास असल्याचे प्रथमदर्शनी डॉक्टरांच्या लक्षात आले. मात्र यापेक्षाही गोंधळात टाकणारी एक गोष्ट डॉक्टरांना सीटी स्कॅन अहवालामध्ये दिसली. या व्यक्तीला दोन ऐवजी तीन किडन्या असल्याचे डॉक्टरांना दिसून आले. डावीकडील किडनी ही व्यवस्थित होती तर उजवीकडील मुख्य किडनीखाली आणखीन एक किडनी असल्याचे डॉक्टरांना दिसून आल्याचं ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन’च्या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

(फोटो सौजन्य: The New England Journal of Medicine)

सुदैवाने या व्यक्तीला या किडनीचा काहीही त्रास झाला नाही. त्याच्या दोन्ही मुख्य किडन्या आणि इतर अवयव व्यवस्थित काम करत होते. सामान्यपणे एखाद्या व्यक्तीच्या शरिरामधील किडनी या युरेनरी ब्लॅडर म्हणजे मुत्राशयाशी युरेटरने जोडलेल्या असतात. मात्र या व्यक्तीच्या तीन किडन्यांपैकी एक किडनी युरेटरच्या माध्यमातून मुत्राशयाशी जोडलेली होती. तर अतिरिक्त किडनी ही दुसऱ्या मुख्य किडनीला मुत्राशयाची जोडणाऱ्या युरेटरशी जोडलेली होती. सामान्यपणे पोटामध्ये गर्भ तयार होणारा अशाप्रकारची तिसरी किडनी शरीरामध्ये तयार होते. या किडनीचा शरीरावर काही विशेष परिणाम जाणून येत नसल्याचे अनेकदा अपघातामुळे किंवा दुसऱ्या एखाद्या आजाराच्या उपचारादरम्यान या किडनीबद्दल समजते.

(फोटो सौजन्य: Steemit)

या रुग्णाला स्लिप डिस्कच्या आजारासाठी गोळ्या देण्यात आल्या. मात्र तिसऱ्या किडनी काढून टाकण्यासंदर्भात कोणताही निर्णय डॉक्टरांनी घेतला नाही. या व्यक्तीला या किडनीचा काहीच त्रास होत नसल्याचे ती तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते. अशाप्रकारे तीन किडन्या असण्याची वैद्यकीय इतिहासामध्ये आत्तापर्यंत १०० हून कमी प्रकरण अढळून आली आहेत.