सध्या जगभरात करोनानं थैमान घातलं आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांना मास्क अनिवार्य केलं आहे. परंतु ब्रिटनमध्ये अशी एक घटना घडली ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. लंडनमध्ये करोना महामारीदरम्यान एक व्यक्तीनं मास्कचं अंतर्वस्त्र करून ते परिधान करत चक्क रस्त्यावरच मुक्त संचार केला. रस्त्यावर फिरताना तो अनेक महिलांसमोरूनही गेला. तर अनेक जण त्याचे फोटो काढतानाही दिसले.

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफर्डसहित लंडनमध्ये मास्क परिधान करणं अनिवार्य करण्यात आलं आहे. तसंच मास्कविना दुकानात आल्यानंतर सामानही देण्यात येत नाही. अशा परिस्थितीत विनामास्क फिरणाऱ्या या व्यक्तीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
दरम्यान, या घटनेनंतर सोशल मीडियावर त्या व्यक्तीचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. परंतु ही व्यक्ती कोण आहे याची मात्र माहिती मिळाली नाही. तसंच त्याच्याविरोधात कोणती कायदेशीर कारवाई झाली अथवा नाही याचीही माहिती समोर आलेली नाही. परंतु ऑक्सफर्ड स्ट्रीटवर फिरणाऱ्या या व्यक्तीचा फोटो मात्र मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सध्या ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. वर्ल्डोमीटरच्या माहितीनुसार ब्रिटनमध्ये आतापर्यंत २ लाख ९७ हजार ९१४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर ४५ हजार ६७७ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ब्रिटनच्या सरकारकडूनही प्रयत्न सुरू आहेत.