तुम्ही घरामध्ये डास झाल्यास काय करता? तुम्ही गुडनाईट वगैरे सारखी डास पळवणारे औषधे किंवा ओडोमॉसवगैरेसारख्या क्रीम वापरुन स्वत:चा बचाव करत असाल. पण युगांडा देशातील एक व्यक्ती डास पळवण्यासाठी चक्क वायू उत्सर्जन (पादणे) करतो. तुम्हाला वाचून हसू येईल कदाचित पण युगांडामधील या माणसाला चक्क डास आणि कीटक पळवण्याची औषधे बनवणाऱ्या कंपनीने करारबद्ध केले आहे. कशासाठी तर संसोधनासाठी.

जो रिवामीरामा असं या ४८ वर्षीय व्यक्तीचे नाव आहे. जो हे युगांडामधील कांपाला येथे राहतात. जो यांच्या पोटामधून निघणाऱ्या वायूमध्ये असे कोणते गुणधर्म आहेत ज्यामुळे डास पळून जातात याबद्दल आता संशोधन केले जात आहे. तुम्हाला डासांचा त्रास होत असेल तर जो यांच्याबरोबर फिरा अशी कांपालामध्ये त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे जो यांच्या पोटातून निघाणारा वायू हा केवळ किटकांसाठी त्यातही खास करुन डासांसाठी हानीकारक आहे.

जो यांनी ‘द सन’ला दिलेल्या मुलाखत दिली आहे. “माझ्या या शक्तीमुळे आमच्या गावामध्ये कधीच कोणाला मलेरिया झाला नाही. माझ्या पोटातून निघणाऱ्या वायूमुळे जवळजवळ सहा माइल्स म्हणजेच दोन किलोमीटरच्या व्यासातील किडे मारले जातात,” असा दावा जो यांनी या मुलाखतीमध्ये केला आहे. “जो यांना शहरातील जवळजवळ सर्वच लोक ओळखतात. आपल्या पादण्याने डास मारण्याची शक्ती असणारा माणूस अशी त्यांची ओळख आहे. तुम्ही जो यांच्याबरोबर असाल तर डास तुमच्या आजूबाजूलाही येत नाही. जो यांच्याकडे पादण्याने डास पळवण्याची शक्ती असली तरी ते आजूबाजूच्या लोकांना मलेरिया पसरवणाऱ्या डासांचा त्रास होऊ लागल्यावरच वायू उत्सर्जन करतात. त्यांच्या या कृतीमुळे एकाप्रकारे मलेरियापासून सामान्यांचा बचाव होतो,” असं जो यांच्याबद्दल बोलताना जेम्स येवरी हा स्थानिक सांगतो.

जो यांना लहानपणापासून ओळखणाऱ्या एका वयस्कर व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, गावामध्ये मलेरियाची साथ पसरायची तेव्हा ते जो यांना स्वत:च्या घरी झोपायला घेऊन जायचे. जो आमच्याबरोबर असल्याने कधीच आम्हाला मलेरियाची बाधा झाली नाही, असंही या व्यक्तीने स्पष्ट केलं. “मी जोकडे असलेल्या या शक्तीबद्दल पहिल्यांदा ऐकलं तेव्हा मी त्याला सर्वाधिक डास असणाऱ्या भागांमध्ये घेऊन गेलो होते. तो अगदी पद्धतशीरपणे आपले काम करतो आणि पाहता पाहता डास पळून जातात,” असं या व्यक्तीने ‘द सन’ला सांगितले.

“मी इतरांप्रमाणेच आहार घेतो. तरी एखादा डास माझ्या अंगावर बसला की तो उडू शकत नाही. मी सामान्यांप्रमाणे रोज अंघोळ करतो. माझ्या पोटातून निघाणारे वायूही सामान्यांप्रमाणेच आहेत. पण तो वायू डासांसाठी घातक आहे,” असं जो सांगतात.

दोन कंपन्यांनी जो यांच्याशी करार केला असून त्यांच्या पोटातून निघाणाऱ्या वायूवर त्यांना संशोधन करायचे आहे असं जो यांनी सांगितलं आहे. मात्र या कंपन्यांनी नावे सांगण्यास त्यांनी नकार दिला आहे.