चोरांनी कधी चोरीचा माल परत केल्याचं तुम्ही ऐकलंय का? जर माल परत करायचाच असेल तर ते चोरी का करतील हा प्रश्न सगळ्यांनाच पडेल. पण जगात काही अजब लोक असतात. ते कधी, कुणाशी कसे वागतील याचा काही नेम नसतो. मंगळुरूमधील शेखर कुंदर यांच्या घरी चोरी झाली. पण चोरांनी दोन दिवसांतच सगळा चोरीचा माल परत केला. उलट मौल्यवान दागिने घरात न ठेवता बँकेत ठेवा, असा सल्लाही त्यांनी कुंदर यांना दिला.

वाचा : मद्यधुंद तरुणांनी अभिनेत्रीला भररस्त्यात काढायला लावल्या उठाबशा

कुंदर दाम्पत्य कामावर गेले होते. हीच संधी साधून चोर घरात घुसले. त्यांनी कुंदर यांच्या घरातील मौल्यवान दागिने आणि १३ हजारांची रोकड लंपास केली. कुंदर दाम्पत्य संध्याकाळी घरी परतल्यानंतर दागिने आणि पैसे चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. पण दोन दिवसांनी दुचाकीवरून आलेल्या एका व्यक्तीने मोठे गाठोडे त्यांच्या घरात भिरकावून पळ काढला. कुंदर यांनी ते उघडून पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. त्या गाठोड्यात चोरीला गेलेले दागिने आणि पैसे होते. त्यात एक चिठ्ठी होती. कुंदर यांच्यासाठी त्यांनी खास संदेश लिहिला होता. ‘पुढील वेळी स्वत:चे मौल्यवान दागिने घरात न ठेवता बँकेत ठेवा’, असे त्यात म्हटले होते.