गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नावे ‘व्हॉटस्अ‍ॅप’वर फिरत असलेला ‘आनंदी जीवनाचा’ संदेश पूर्णत: खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्या या संदेशातील वाक्यात अज्ञात व्यक्तीने पर्रिकर यांच्या आजारपणाचा उल्लेख केला आहे. परंतु पर्रिकर यांनी पुढील उपचारांसाठी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी असा कोणत्याही स्वरुपाचा संदेश समाजमाध्यमांवर टाकलेला नाही वा तशा आशयाचे कोणते पत्रही त्यांनी लिहिले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका ध्वनिचित्रफितीत मुख्यमंत्री पर्रिकर स्वत:च्या चांगल्या आरोग्यासाठी जनतेला देवाकडे प्रार्थना करण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. ‘इंडिया टुडे’च्या संकेतस्थळावरील बातमीत या ध्वनिचित्रफितीबाबत उल्लेख करण्यात आला आहे. त्या वेळी त्यांना वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.