मध्य प्रदेशमधील राहळी गावातील एका ७४ वर्षीय शेतकऱ्यावर नुकतीच एक शस्त्रक्रिया करण्यात आली. शामलाल यादव नावाच्या या शेतकऱ्याच्या डोक्यावरील शिंग शस्त्रक्रिया करुन काढण्यात आले. ऐकायला जरा विचित्र वाटेल मात्र खरोखरच ही शस्त्रक्रिया करण्यात आली असून शामलाल यांना आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पाच वर्षांपूर्वी एका छोट्या अपघातामध्ये शामलाल यांच्या डोक्याला मुका मार लागला होता. त्यानंतर त्यांच्या डोक्यावर टेंगुळ येण्याऐवजी शिंगासारखा भाग दिसू लागला. विशेष म्हणजे प्राण्यांची शिंग वाढतात त्याप्रमाणे या भागाचा आकार वाढू लागला. जेव्हा जेव्हा हा भाग वाढलेला दिसायचा तेव्हा रामलाल सलूनमध्ये जाऊन तो कापून यायचे. मात्र अचानक या शिंगासारख्या भागाची भराभर वाढ होऊ लागली आणि ते १० सेंटीमीटरपर्यंत लांब झाले. मात्र या शिंगाची लांबी आणि जाडपणा पाहून सलूनमध्ये ते कापण्यास नकार दिला. त्यानंतर शामलाल यांनी डॉक्टरांकडे धाव घेतली. सागर शहरामधील भाग्योदय तिर्थ रुग्णालयामधील डॉक्टरांनी शामलाल यांच्या डोक्यावर शस्त्रक्रिया करुन हा शिंगासारखा भाग काढला.

रामलाल यांच्यावर शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर विशाल गजभिये याबद्दल म्हणतात, ‘पाच वर्षांपूर्वी या रुग्णाच्या डोक्याला मार लागल्यानंतर त्याच्या डोक्यावर हा शिंगासारखा भाग दिसू लागला. यामुळे दैनंदिन कामामध्ये काही अडचण येत नसल्याने रामलाल यांनी त्याकडे दूर्लक्ष केले. मात्र ते वेळोवेळी सलूनमध्ये जाऊन हा शिंगासारखा भाग कापून यायचे. मात्र या शिंगाची वाढ अधिक झाली आणि ते टणक झाल्याने सलूनमध्ये कापणे कठीण झाल्याने त्यांनी रुग्णालयात धाव घेतली.’

डोक्यावर शिंगासारखा भाग वाढल्यास वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्याला ‘डेविल्स हॉर्न’ असे म्हणतात. अगदीच वैद्यकीय भाषेत त्याला ‘सेबेशियस हॉर्न’ असं म्हणतात. ‘ज्याप्रमाणे आपली नखे कॅरटीनने तयार होता त्यापासूनच शिंग तयार होते. अशाप्रकारचे शिंग हे समान्यपणे विशेष प्रकारच्या रेझरने काढले जाते. मात्र शिंग काढल्यानंतर ते पुन्हा वाढणार नाही याची काळजीही घ्यावी लागते,’ असं डॉक्टर विशाल यांनी सांगितलं. एकाद्या व्यक्तीच्या डोक्यावर अशाप्रकारेच शिंग कसे उगवते याबद्दल कोणतेही ठोस कारण अद्याप संशोधकांना सापडलेले नाही. मात्र एका अंदाजानुसार रेडिएशन आणि अल्ट्रा व्हॉयलेट रेजमुळे (युव्ही) अशाप्रकारचे शिंग उठवू शकते.