रणवीर सिंग आणि आलिया भटच्या ‘गली बॉय’ या सिनेमानंतर हिपहॉप आणि रॅप साँगबद्दल सामान्यांमधील आकर्षण अधिक वाढल्याचे चित्र दिसत आहे. मात्र हा सिनेमा प्रदर्शित होण्याच्या आधीपासून अनेक शहरांमध्ये रॅप साँग गाणारे अनेक स्थानिक गायक वेगवेगळे विषय रॅप संगिताच्या माध्यमातून मांडत आहेत. यामध्ये केवळ इंग्रजी, हिंदीबरोबरच स्थानिक भाषांमधील गाण्यांचाही समावेश आहे. मराठीमध्येही काही रॅप गायक लोकप्रिय आहेत. मात्र मागील काही दिवसांपासून ‘रॅपबॉस’ हा गायकाची सोशल नेटवर्किंगवर बरीच चर्चा आहे. ‘रॅपबॉस’बद्दल चर्चा होण्याचे कारण म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे त्याने तयार केलेले ‘सांगा शेती करु कशी?’ हे व्हायरल झालेले मराठमोळे रॅप साँग.

जून महिना संपत आला तरी अद्याप राज्यामध्ये मान्सूनचे आगमन झालेले नाही. त्यामुळे पिकांची पेरणी करायची की नाही याबद्दल शेतकऱ्यांमध्ये अद्याप संभ्रम दिसत आहे. ही पावसाळ्यातील स्थिती असली तरी वर्षभर अनेक अडचणींचा सामना करुन बळीराजा शेती करत आहे. याच समस्या ‘रॅपबॉस’ या गायकाने मांडल्या आहेत. युट्यूबवर चेतन गरुड प्रोडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड या चॅनेलवरुन हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला असून त्याला युट्यूबवर एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर फेसबुकवर ‘रॅपबॉस’च्या पेजबरोबरच इतर अनेक पेजेसनेही या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

या गाण्यामधून शेतीसंर्भातील अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. कशाप्रकारे खडतर परिस्थितीमध्ये शेतकरी शेती करत आहे याचे वर्णन ‘रॅपबॉस’ने या गाण्यात केले आहे. शेतकरी आत्महत्या, पिकांना (कांदा, ऊस, तुरडाळ) हमी भाव न मिळणे, मुलांना शाळेत भरायला फीचे पैसेही नसणे, व्यापाऱ्यांची आणि सरकारची मनमानी, कागदावरच मिळणारा हमी भाव, दुष्काळ अशा अनेक विषयांना ‘रॅपबॉस’ने या गाण्याच्या माध्यमातून हात घातला आहे.

गाण्याचे शब्द

जनता सारी झोपली का?
शेतकऱ्यावर कोपली का?
आत्महत्येची कारणे त्याच्या
सांगा तुम्ही शोधली का?
शोभली का तुम्हाला
भाकरी त्याचा कष्टाची?
दोन रूपयाच्या भाजी साठी
वाद केला त्याच्याशी
चार घोट पानी पिऊन
खेटर घेतल उषाशी
पोशिंदा तो जगाचा आज
झोपला र उपाशी

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

कांद्याला भाव नाय
उसाला भाव नाय
तुरीला भाव नाय
खाऊ काय?
आलेल्या पैश्यात
उधारी दिली मि
सावकाराला
देऊ काय?
पोराच्या शाळेची
फीस नाय भरली
पोराला घरिच
ठेऊ काय?
एकच दिसतो
पर्याय आता
गळ्याला फास मी
लाऊ काय?

व्यापाऱ्याची मनमानी
सरकारची आणिबानी
शान के साथ यांचा थाट
कष्टकऱ्याच्या डोळ्यात पानी
पानी कस शेताला देऊ
विज दिली रात्रिची
रात्रीच्या त्या काळोखात
भीति विंचु सापाची

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

मेहनत करुन पिकवलेल्या
मालाला आमच्या कमी भाव
सरकार जरी बदलल तरी
कागदावरच हमी भाव
भेगा पडल्या धरणीमायला
दुष्काळी झाली परिस्थिति
सर्वे,दौरे खोटे सगळे
प्रचारासाठीची उपस्थिति
जीवाच्या पल्याड जपलेली
माझी सर्जा-राजा उपाशी
उपाशी त्यांना ठेऊन सांगा
भाकरी मी खाऊ कशी
प्रश्न माझा उत्तर दया
सांगा शेती करु कशी?

सांगा शेती करु कशी?
करु कशी?
पोटाची खळगी भरु कशी?
भरु कशी?

माझ्या मराठीसाठी,
जगाच्या पोशिंदयासाठी.

हे गाणे मराठी दिग्दर्शक विजू माने यांनाही आवडले असून त्यांनीही फेसबुकवरुन शेअर केले आहे. ‘रॅपबॉस, तू जो कोण आहेस तो‌ कमाल‌ आहेस. इत़कं सुंदर रॅप साँग माझ्या पाहण्यात आलं नाही,’ असं माने यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या गाण्याला नेटकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे फेसबुक तसेच ट्विटवरील कमेंटसवरुन दिसून येत आहे. युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडिओच्या खालील डिस्क्रीप्शनमध्ये ‘या गिताचा (शेतकऱ्यांच्या भावनांचा) वापर कुठल्याही राजकीय पक्षाने स्वतःच्या हितासाठी करु नये’, असं म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या सत्य परिस्थितीची जनतेला जाणीव करून देणारे हे गाणे अगदीच उत्तम असल्याचे मत नेटकऱ्यांनी व्यक्त केले आहे.