(Image: Caters News Agency)वयामध्ये जास्त अंतर असणाऱ्या व्यक्तींनी एकमेकांशी लग्न करणं हे आजच्या आधुनिक युगात अगदीच सामान्य मानलं जातं. अगदी सेलिब्रिटांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत अशी अनेक उदाहरणे पहायला मिळताता जिथे लग्न झालेल्यांमध्ये जास्त अंतर असतं. मात्र अमेरिकेमधील एका दांपत्याला हे वयातील जास्त अंतर असणं चांगलंच महागात पडलं. मीरर युकेने दिलेल्या वृत्तानुसार पती पत्नी एकत्र फिरत असताना त्या दोघांमधील वयाचे अंतर आणि पेहरावावर शंका आल्याने नवरा वयाने लहान दिसणाऱ्या पत्नीचे अपहरण करत असल्याची तक्रार थेट पोलिसांकडे करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार, २२ वर्षीय टोरी आणि तिचा ४९ वर्षीय पती एडी यांच्यासंदर्भात हा चमत्कारिक प्रकार घडला आहे. या दोघांमध्ये २७ वर्षांचे अंतर आहे. एडीच्या एका ओखळीच्या व्यक्तीने त्याला एका तरुण मुलीबरोबर गाडीमधून जाताना पाहिले. त्यामुळे एडीने एका तरुण मुलीचे अपहरण केल्याची शंका या व्यक्तीला आली. या व्यक्तीने पोलिसांना फोन करुन यासंदर्भात कळवले. बाल्टीमोर पोलिसांनी तातडीने एडीच्या गाडीचा पाठलाग करुन त्याला पकडले. पोलिसांनी गाडी थांबवली तेव्हा एडी गाडी चालवत होता तर त्याची पत्नी म्हणजेच टोरी त्याच्या बाजूला बसली होती. एडीला जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले तेव्हा त्याला धक्काच बसला. त्याने आपली पत्नी ही तिच्या वयापेक्षा जास्त तरुण वाटत असल्याने गैरसमज झाल्याने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असल्याचे सांगितले.

“मला एडीबरोबर भटकायला आवडतं. आम्ही अनेकदा भटकायला जातो. अगदी कधीकधी त्याला ऑफिसला सोडण्यासाठीही मी जाते. त्याच्याबरोबर भटकताना मला घराबाहेर पडण्याची संधी मिळते. असेच काही आठवड्यांपूर्वी आम्ही बाहेर फिरायला गेलेलो असताना त्याच्या ओळखीच्या कोणत्यातरी व्यक्तीला मला त्याच्याबरोबर पाहिले आणि मी १३ वर्षाची असल्याची शंका त्या व्यक्तीला आली. त्यामुळेच तिने थेट पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली असावी,” असं टेरीने मीरर युकेशी बोताना सांगितलं.

“आमच्यासमोरचा ट्रक जाण्याची आम्ही वाट पाहत असतानाच पोलिसांच्या दोन गाड्या आल्या आणि त्यांनी एडीला खाली उतरण्यास सांगितलं. आम्ही या सर्वांमुळे गोंधळलो. ही व्यक्ती तुझी कोण लागते असं मला पोलिसांनी विचारल्यानंतर एडी माझा पती असल्याचे मी त्यांना सांगितलं. मात्र हा सगळा काय गोंधळ सुरु आहे हे आम्हाला समजत नव्हतं,” असं टोरी घडलेल्या प्रकाराबद्दल सांगताना म्हणाली.


टोरीच्या बोलवण्यावर पोलिसांचा विश्वास बसत नसल्याने त्यांनी तिच्याकडे ओळखपत्र मागितले. तिने ओळखपत्र दाखवल्यानंतर पोलिसांनाही हसू आलं. त्यांनी घडलेल्या चुकीबद्दल दोघांचीही माफी मागितली आणि त्यांना जाऊ दिलं.