आपल्या सौरमालेमध्ये सर्वाधिक आश्चर्यचकित करणारे दोन ग्रह म्हणजे मंगळ आणि शनी. मंगळावर पाण्याचा शोध सुरु असल्यामुळे तर शनीभोवती असलेल्या कड्यांमध्ये त्याच्याबद्दल अधिक अधिक माहिती जमवण्यासंदर्भात खगोलप्रेमींना कायमच उत्सुकता असते. मात्र याच मंगळाबद्दल आता एक नवीन दावा संशोधकांनी केला आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स जर्नल लेटर्समध्ये (Astrophysical Journal Letters) छापून आलेल्या एका संशोधनानुसार मंगळाभोवतीही शनीप्रमाणे कडे होते. मंगळाभोवती फिरणाऱ्या दोन चंद्रांचा विस्फोट होऊन हे कडे तयार झाले होते आणि नंतर पुन्हा या तुटलेल्या गोष्टींपासून चंद्र तयार झाल्याचा दावा संशोधकांनी केला आहे.

मंगळाला दोन चंद्र आहेत. एकाचे नाव आहे फोबोस (Phobos) आणि दुसऱ्याचे आहे डीमोज (Deimos). हे दोन्ही चंद्र पूर्णपणे गोलाकार नसून वेड्यावाकड्या आकाराचे आहेत. तसेच त्यांची मंगळाभोवती फिरण्याची भ्रमणकक्षाही गोलाकार नसून वेडीवाडीच आहे. याच चंद्रांचा अभ्यास केल्यानंतर मंगळाभोवती एकेकाळी कडं होतं असा दावा संशोधकांनी केला आहे. सुर्यमालेमधील सर्व ग्रहांच्या चंद्रांचा विचार केल्यास मुख्य ग्रहाच्या सर्वात जवळ असणारा चंद्र अशी फोबोसची ओळख आहे. फोबोस अवघ्या सात तास ३९ मिनिटांमध्ये मंगळाभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतो. तर डीमोज हा फोबोसपेक्षा आकाराने छोटा असून दूर आहे. असं असलं तरी तो फोबोसपेक्षा कमी अधिक नियोजित पद्धतीने मंगळाभोवती वर्तुळाकार प्रदक्षिणा घालतो. डीमोज हा चंद्र मंगळाच्या भूपृष्ठाशी दोन अंशाच्या कोनात प्रदक्षिणा घालतो. पूर्वी हे दोन्ही चंद्रमध्ये मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामध्ये आलेले लघुग्रह आहेत असं समजलं जायचं.

मंगळाचे चंद्र (फोटो सौजन्य: नासा)

एसईटीआय इन्स्टीट्यूट आणि परड्यू युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या संशोधनामध्ये या चंद्रांची भ्रमणकक्षा अशी विचित्र का आहे यासंदर्भातील अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. मंगळाभोवती आधी एक मोठा चंद्र फिरत होता आणि त्याच्या भ्रमणकक्षेमुळे डीमोज दोन अंशाने कलला असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. अ‍ॅस्ट्रोफिजिक्स जर्नल लेटर्समधील या संशोधनाचा अहवाल याच आठवड्यात व्हर्चूअल माध्यमातून झालेल्या अमेरिकन अ‍ॅस्ट्रोनोमिकल सोसायटीच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. या अहवालानुसार ३ बिलीयन म्हणजेच ३०० कोटी वर्षांपूर्वी मंगळाभोवती फोबोसपेक्षा २० पटीने मोठा चंद्र फिरायचा.

नक्की वाचा >> लवकरच शनीची सर्व कडी नष्ट होणार

मंगळाच्या गुरुत्वाकर्षणामुळे या चंद्राचा नाशा झाला. हा चंद्र मंगळाकडे खेचला गेला आणि त्याचा स्फोट होऊन छोटे छोटे तुकडे झाले. हे तुकडे मंगळाभोवती फिरु लागले आणि त्याचं कडं निर्माण झालं. मात्र त्यापैकी बराच भाग मंगळाच्या पृष्ठभागाकडे खेचला गेला. मंगळाच्या चंद्राचा जन्म आणि नाश होण्याची एक ठरावी पद्धत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. मंगळाभोवती फिरणारे चंद्र अचानक त्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृष्ठभागाकडे खेचले जातात. गुरुत्वाकर्षणामुळे त्यांचे तुकडे होतात. काही काळ हे तुकडे मंगळाभोवती फिरतात. त्यापैकी अनेक मंगळावर आदळतात आणि उरलेले तुकडे पुन्हा एकत्र येऊन नवा चंद्र निर्माण होतो असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

मंगळाचा चंद्र फोबोस (फोटो सौजन्य: नासा)

२०१७ सालीही अशाच पद्धतीचे एक संशोधन करण्यात आलं होतं. त्यामध्येही मंगळाभोवती फिरणाऱ्या चंद्रांची निर्मिती आणि नाशासंदर्भात पुन्हा पुन्हा तीच प्रक्रिया घडत असल्याचे निरिक्षण नोंदवण्यात आलं होतं. मंगळाच्या अस्तित्वापासून आतापर्यंत अनेकदा त्याच्या चंद्रांचा नाश आणि निर्मिती झाल्याचे या संशोधनात नमूद करण्यात आलं होतं.

मंगळाचा फोबोस या चंद्राची निर्मिती २० कोटी वर्षांपूर्वी झाल्याचे सांगण्यात येतं. ५ कोटी वर्षांनंतर फोबोसही मंगळाकडे खेचला जाऊन त्याचे तुकडे होतील आणि त्यामधून कडं निर्माण होईल असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.