मंगळवारी भारत आणि चीनच्या सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले. यामध्ये तेलंगणमधील कर्नल संतोष बाबू (३७) यांचाही समावेश होता. कर्नल संतोष बाबू यांच्या निधनानंतर सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये एक लहान मुलगी संतोष बाबू यांच्या फोटोसमोर उभी राहून पाया पडताना दिसत आहे. हा फोटो संतोष बाबू यांच्या सहा वर्षीय मुलीचा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र हा फोटो संतोष बाबू यांच्या मुलीचा नसून कर्नाटकमधील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यकर्त्याच्या लहान बहिणीचा आहे. एबीव्हीपीच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन हा फोटो ट्विट करण्यात आला आहे.

कर्नाटकमधील निलमंगला तालुक्यातील एबीव्हीपीच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या लहान बहिणीबरोबर गलवान खोऱ्यात भारत आणि चीनमध्ये झालेल्या संघर्षात शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना श्रद्धांजली वाहिली, अशा कॅप्शनसहीत चार फोटो एबीव्हीपीच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आले आहे.

मुळेच हैद्राबादचे असणाचे संतोष बाबू सीमेवर शहीद झाल्याचे समजल्यानंतर त्यांच्या पालकांना धक्काच बसला. वडील बी उपेंद्र (६३) आणि आई मंजुळा (५८) यांना मंगळवारी दुपारी दोनच्या सुमारास मुलगा शहीद झाल्याचे वृत्त समजले. “आम्ही भारत चीन सीमेवरील लढाई संघर्षाबद्दलच्या बातम्या टीव्हीवरुन पाहत होतो. मात्र शहीदांची नाव टीव्हीवर दाखवण्यात आली नव्हती. त्यामुळे शहीद झालेल्यांमध्ये आमच्या मुलाचा समावेश असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं. मात्र दिल्लीमधून आमच्या सुनेचा फोन आल्यानंतर आम्हाला या घटनेबद्दल समजलं. तो आम्हाला अशाप्रकारे सोडून जाईल असं वाटलं नव्हतं. मात्र त्याने देशासाठी बलिदान दिल्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं उपेंद्र यांनी सांगितलं. दोन दिवसांपूर्वीच आपलं संतोषशी बोलणं झालं होतं. त्यावेळी त्याने सप्टेंबरमध्ये परत येईल असं म्हटलं होतं, अशी आठवणही उपेंद्र यांनी सांगितली.

“मागील बऱ्याच काळापासून संतोष हैदराबादमध्ये बदली करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होता. अखेर फेब्रुवारीमध्ये त्याला बदलीसंदर्भात मान्यताही देण्यात आली होती. कर्नल झाल्यानंतर त्याला बदली मंजूर करण्यात आली होती. मात्र यासंदर्भातील कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण होण्याआधीच लॉकडाउन सुरु झाला आणि त्याला भारत-चीन सीमेवर नियुक्त करण्यात आले,” असं त्याचे काका गणेश बाबू यांनी सांगितलं.

संतोष यांच्या मागे आई-वडील, बहीण, पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. संतोष यांची पत्नी, सहा वर्षाची मुलगी अभिघना आणि चार वर्षांचा मुलगा अनिरुद्ध हे दिल्लीमध्ये राहतात.