ग्रीसच्या किनाऱ्यावर वसलेलं आयटॉलिको हे गावं तिथे सुरू असलेल्या विचित्र घटनेनं चर्चेत आलं आहे. हे गाव सध्या कोळ्याच्या जाळ्यात अडकलंय. अनेकांना नवल वाटत असलं तरी इथली परिस्थिती सध्या अशीच काहीशी विचित्र झाली आहे.

आठ पायांच्या लहान किटकांनी रातोरात या परिसरात जाळी विणली आहेत. त्यामुळे किनाऱ्यावर उगवलेलं गवत, लहान मोठी झाडं, रस्त्यांवर जिथे नजर जाईल तिथे कोळयांनी लांबच्या लांब जाळी विणलेली दिसत आहे. ही जाळी जवळ पास एक हजारांहून अधिक जास्त फूटांपर्यंत पसरली आहेत असं समोर आलं आहे. लांबच्या लांब पसरलेली ही जाळी आणि त्यात राहणारे हजारो कोळी असं चित्र अंगावर काटा आणण्यासारखं असलं तरी इथल्या लोकांना आता याची सवय झाली आहे. सर्वदूर पसरलेली कोळ्याची जाळी पाहून जणू गाव कोळ्यांच्या जाळ्यात अडकलंय की काय असाच भास होत आहे.

यापूर्वी २००३ मध्ये कोळ्यांनी संपूर्ण परिसरातील झाडांवर, रस्त्यांवर अशीच  जाळी विणली होती. येथे डासांची संख्या खूपच वाढली आहे आणि त्याचमुळे या डासांवर पोट भरणाऱ्या कोळ्यांचीही संख्या वाढली आहे. या डासांना पकडण्यासाठी तसेच विणीसाठी या कोळ्यांनी जाळी विणली आहेत. जोपर्यंत डासांची संख्या इथे जास्त तोपर्यंत कोळ्यांची जाळी वाढत जातील असं म्हटलं आहे.