प्रसिद्ध फूडचेन असलेले मॅकडोनल्डस वेगवेगळ्या गोष्टींमुळे सध्या बरेच चर्चेत असल्याचे दिसते. नुकतीच आणखी एक घटना घडल्याने ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. लंडनमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीला तिचा हिजाब काढून आतमध्ये जाण्यास सांगण्यात आले. मॅकडोनल्डसच्या दुकानाबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकाने अशा अजब प्रकारच्या केलेल्या मागणीने ही विद्यार्थिनी इतकी चिडली की, तिने पुन्हा मॅकडोनल्ड्सची पायरी पुन्हा कधीच न चढण्याचा निश्चय केला.

लंडनमधील हॉलोवे या ठिकाणच्या सेव्हन सिस्टर रोडवर हे आऊटलेट आहे. याठिकाणी घडलेली ही घटना ही विद्यार्थिनी आणि तिच्या मैत्रिणीसाठी खऱ्या अर्थाने चकित करणारी होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. मी मागील १७ वर्षांपासून लंडनमध्ये राहते आणि सर्वठिकाणी याच वेशात जाते. मात्र अद्याप मला कोणत्याही ठिकाणी अशापद्धतीची वागणूक देण्यात आली नाही. मात्र या अजब मागणीमुळे मला खऱ्या अर्थाने धक्का बसला आहे.

या गार्डने मुलीला काऊंटरवरील रांगेत उभे राहण्यास मनाई केली. मुलीला या गोष्टीचा राग आला आणि तिने या सुरक्षारक्षकाशी हुज्जत घालायला सुरुवात केली. हिजाब उतरवायला लावणे हा धार्मिकतेशी निगडीत मुद्दा आहे. त्यामुळे मी रांगेत थांबून माझी ऑर्डर घेणार असेही तिने यावेळी सांगितले. या मुलीने व्हिडिओ काढल्याचे येथील व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यावर त्यांनी तिला जास्त विरोध न करता आपली ऑर्डर घेण्यास सांगितले. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करण्यात आला असून तो त्या मुलीने स्वत:च काढला आहे. यानंतर सोशल मीडियावर याविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे, अशापद्धतीने एखाद्या धर्माचा अवमान करणे चुकीचे असल्याचेही सांगण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर मॅकडोनल्डसने माफी मागितली असून त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन आपली अशाप्रकारची कोणतीही पॉलिसी नसल्याचे स्पष्ट केले. मात्र या सर्व प्रकारामुळे सुरक्षारक्षकाची नोकरी गेली आहे.