जगात सर्वाधिक हत्यारे बाळगणारी व्यक्ती कोण तुम्हास ठाऊक आहे का?, या व्यक्तीचे नाव आहे मेल बर्नस्टाइन. अमेरिकेतील प्रसिद्ध अशा ड्रॅगन आर्म्स या दुकानाचे मालक असणारे बर्नस्टाइन हे सर्वाधिक हत्यारांची मालकी असणारी व्यक्ती म्हणून ओळखले जातात.

तुमचा विश्वास बसणार नाही पण बर्नस्टाइन यांच्याकडे ४ हजार बंदुका आहेत. यामध्ये अत्याधुनिक लाइट गन्स पासून बजूका आणि मशीन गन्सचाही समावेश आहे. बर्नस्टाइन हे सहा शुटिंग रेंज, पेंटबॉल पार्क आणि मोटरक्रॉस पार्कचे मालक आहेत. अमेरिकेमध्ये ते ड्रॅगन मॅन नावाने लोकप्रिय आहेत.

बर्नस्टाइन यांनी एसीबी न्यूजला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की लास वेगास येथील हल्ल्यानंतर त्यांच्या दुकानामध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून हत्यारांचा खपही वाढला आहे. मागील आठ महिन्यांमध्ये मी जेवढ्या बंदुका विकल्या नाहीत तितक्या मी मागील तीन आठवड्यात विकल्या आहेत, असे त्यांनी सांगितले. दोन ऑक्टोबरला लास वेगास येथे झालेल्या गोळीबारामध्ये वापरण्यात आलेल्या बंदुकाही बर्नस्टाइन यांच्याकडे आहेत.

अमेरिकेत वारंवार होणाऱ्या गोळीबारात मरण पावणाऱ्यांची संख्या खूप आहे. २०१६मधील एका सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील केवळ ३ टक्के लोकसंख्येकडे २५ कोटी ५० लाख हत्यारे आहेत. एका व्यक्तीकडे अंदाजे १७ हत्यारे असे हे प्रमाण आहे.