एखाद्या प्राण्यावर हल्ला करणे किंवा त्याच्यावर बळजबरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे. अगदी एखाद्या प्राण्याला बळजबरीने खाऊ घालणेही गुन्हा आहे. मात्र अनेकदा आपल्या आनंदासाठी प्राण्यांना काही लोक त्रास देताना दिसतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरातमधील असून या व्हिडिओमध्ये काही लोक एका बिबट्याच्या बछडाचा छळ करताना दिसत आहेत.

ट्विटरवर झुबेन अशरा या ट्विटर अकाऊंटवरुन बिबट्याच्या बछड्याचा छळ करणाऱ्या काही जणांचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. ‘बिबट्याच्या बछड्याची छेड काढणाऱ्या या सर्वांना शिक्षा झाली पाहिजे. ज्यांना कोणाला हे कोण आहेत हे ठाऊक असेल त्यांनी मला किंवा वन विभागाला मेसेज करा. हा व्हिडिओ गीर अभयारण्याच्या परिसरातील असल्याचे समजते,’ असे कॅप्शन हा व्हिडिओ शेअर करताना झुबेन यांनी दिले आहे.

या व्हिडिओमध्ये काही जणांनी बिबट्याच्या बछड्याला पकडल्याचे दिसते. ते लोकं या बछड्याला खेचताना आणि ओढताना दिसत आहेत. या सर्वाचा आनंद घेताना हे लोकं दिसत असून शुटींग करणाऱ्याने स्वत:चा चेहरा दिसावा म्हणून कॅमेरा पॅन केल्याचेही दिसते.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सरकारी अधिकारी असणाऱ्या प्रवीण कासवान यांनी या प्रकरणाची संबंधित खात्याला माहिती दिली.

त्यानंतर कासवान यांनी ट्विट करुन व्हिडिओत दिसणाऱ्या लोकांची माहिती देणाऱ्यांना ग्रेटर गीर टास्क फोर्सकडून २५ हजारांचे बक्षिस दिले जाईल अशी माहिती दिली.

व्हायरल व्हिडिओमध्ये हा बछडा घाबरल्याचे दिसत आहे. मात्र तरीही या लोकांनी त्याचा छळ सुरुच ठेवल्याचे दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी कमेंट करुन या लोकांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. मात्र भारतीय कायद्यानुसार शिकारीसाठी शिक्षा असली तरी प्राण्यांचा छळ करणाऱ्यांना कठोर शिक्षा केली जात नाही.