वर्ष संपायला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्यामुळे आता अनेकांनी वर्षभरातील घटनांचा लेखाजोखा मांडायला सुरूवात केली आहे. घटनांची यादी समोर येत आहे. दरवर्षी चांगल्या-वाईट घटना, सर्वाधिक प्रसिद्ध झालेले व्हिडिओ, गाणी, चित्रपट, व्यक्ती अशा गोष्टींचा लेखाजोखा वेगवेगळ्या संस्थांकडून मांडला जातो.

यानिमित्तानं २०१७ मधल्या सर्वाधिक सर्च केल्या गेलेल्या शब्दांची यादी ‘मेरियम-वेबस्टर’नं जाहीर केली आहे. या यादीत ‘फेमिनिजम’ हा शब्द अव्वल आहे. अनेक हॉलिवूड सेलिब्रिटींनी मुलाखतीदरम्यान हा शब्द वापरला. तेव्हा इंटरनेटवर सर्वाधिक लोकांनी या शब्दाचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला. ‘फेमिनिजम’ या शब्दाचा अर्थ होतो ‘स्त्रीवाद’. ‘#metoo’ या मोहिमेनंतरही ‘फेमिनिजम’ हा शब्द सर्वाधिक चर्चेत आला होता.
‘फेमिनिजम’ नंतर सर्वाधिक शोधला गेलेला शब्द होता ‘कॉम्प्लिसिट’. ज्याचा केंब्रिज शब्द कोशाप्रमाणे अर्थ होतो एखादी गोष्ट गुन्हा आहे, हे माहिती असूनही त्या व्यक्तीला मदत करणं. ट्रम्प सरकारनं अनेकदा या शब्दाचा वापर केला. त्यानंतर ‘इम्पथी’ Empathy, ‘डोटड’ Dotard, ‘जायरो’ Gyro हे शब्द देखील सर्वाधिक सर्च केले गेले. विशेष म्हणजे उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जाँग उननं डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी ‘डोटड’ हा शब्द वापरला होता. तेव्हा कुतूहल म्हणून लोकांनी या शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी इंटरनेटची मदत घेतली. वाढत्या वयासोबत मानसिक संतुलन ढासळत गेलेली व्यक्ती या अर्थानं ‘डोटड’ हा शब्द वापरला जातो.

त्यानंतर ‘जायरो’ Gyro या शब्दाचा सर्वाधिक शोध घेतला गेला. हा सँडविचचा एक प्रकार आहे. शिवया ‘गफ’, ‘हरिकेन’ हे शब्द देखील सर्वाधिक सर्च केले गेले.