अनेक असाध्य स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास मानव उराशी बाळगतो आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रमदेखील घेतो. त्यातील काही स्वप्नं त्याने पूर्णदेखील केली. त्यातीलच एक स्वप्न म्हणजे आकाशात उडण्याचे. पक्षांना आकाशात उडताना पाहून मानवालादेखील आकाशात उडण्याची तीव्र इच्छा झाली. यातूनच मग विमानाचा शोध लागला आणि मानवाने गगन भरारी घेतली. आता तर तो पक्षांच्या थव्याचा भाग होत त्यांच्यासोबत देखील उडत आहे. ख्रिस्टिन मौल्लेक नावाच्या फ्रेंच व्यक्तिला हे साध्य झालं आहे. आपल्या मायक्रोलाइट विमानामधून पक्षांसोबत उडणारा हा ५८ वर्षीय अवलिया ‘बर्डमॅन’ म्हणून ओळखला जातो. ख्रिस्टिन अनेक हंसांचा प्रेमाने सांभाळ करत असून हंस देखील त्याच्यावर तितकंच प्रेम करतात. त्यांच्यातील नात जणू आई आणि मुलाप्रमाणेच आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलामुळे काही पक्षांना स्थलांतर करावं लागतं. आपल्या हंसांनादेखील स्थलांतर करता यावं यासाठी १९९५ पासून ख्रिस्टिन मायक्रोलाइट विमानात बसून त्यांच्यासोबत आकाशात प्रवास करू लागले. तेव्हापासून ख्रिस्टिनने त्यांचं आयुष्य हंसांच्या पालनपोषणासाठी वाहीलं आहे. ख्रिस्टिनकडे असलेल्या हंसांमध्ये अनेक हंस अगदी लहान असल्यापासून त्यांच्याकडे आहेत. तर काही अनाथ हंस देखील आहेत. आईच्या मायेने ते हंसांचा सांभाळ करतात. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाल्यास, पक्ष्याची पिल्लं जन्मल्यानंतर पहिली हलणारी गोष्ट पाहतात ती म्हणजे त्यांची ‘आई’. लहानपणी ती आईच्या मागेमागे फिरतात. ख्रिस्टिनने याच सिध्दांताचा वापर करत हंसांसोबत उडण्याचे कौशल्य प्राप्त केलं. ही अत्यंत कठीण आणि दीर्घ प्रक्रिया होती, असं देखील ते सांगतात.

हंसांसोबत उडताना ख्रिस्टिनचे आनंदाश्रू अनावर होतात. आपला हा आनंद ते इतरांनादेखील अनुभवायला देतात. यासाठी जगभरातून अनेकजण ख्रिस्टिनकडे येतात. पक्षांसोबतच्या अर्ध्या तासाच्या या प्रवासासाठी काहीजण १५ तासांचा प्रवास करून दाखल होतात. पक्षांसोबत उडण्याचा त्यांचा आनंद गगनात मावत नाही. ख्रिस्टिन पर्यटकांना उडणाऱ्या हंसाला स्पर्श करण्याची संधी देखील देतात. पक्ष्यांसोबत उडण्याचा अनुभव घेऊन पर्यटक अतिशय भावुक होतात. माझ्या हंसांना प्रेमळ मानवी स्पर्श आवडत असला, तरी उडणाऱ्या पक्षाला स्पर्श केल्यास पक्षाचा तोल जाऊ शकतो आणि अशावेळी तो पर्यटकाच्या आंगावर विष्ठा करतो. असं एक-दोन वेळा झाल्याचं ख्रिस्टिन सांगतात. ख्रिस्टिन आणि हंस यांच्यातील प्रेमाचा ओलावा त्यांच्या एकत्र हवेत उडण्याने अधिक प्रकर्षाने जाणवतो. हे दृश्य खूप विहंगम असतं.