पृथ्वीबाहेर मानवी वसाहत स्थापन करण्याचे वैज्ञानिकांचे मागील अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरु आहेत. जेव्हा जेव्हा आपण इतर ग्रहांवर वसाहत निर्माण करण्यासंदर्भातील चर्चा ऐकतो किंवा पाहतो तेव्हा परग्रहावरील जीवसृष्टीचा म्हणजेच एलियन्सचा उल्लेख आवर्जून केला जातो. मानवाला एलियन्सबद्दल कायमच आकर्षण राहिले आहे. चित्रपटांमधून या एलियन्सच्या भन्नाट कल्पनाकथाही अनेकजण अगदी आवडीने बघतात. मात्र खरोखर एलियन्स अस्तित्वात असतील का या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या काही संशोधकांनी एक आश्चर्यचकित करणारा खुलासा केला आहे. आपली सौरमाला असणाऱ्या आकशगंगेमध्येच एलियन्सच्या ३० वसाहती अस्तित्वात असू शकतात असं या संशोधकांनी म्हटलं आहे. युरेका अ‍ॅलर्ट या वेगवेगळे अहवाल प्रकाशित करणाऱ्या वेबसाईटवर यासंदर्भातील संशोधनाचा अहवाल उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

संशोधकांनी केलेल्या अभ्यासानंतर त्यांनी आपल्या आकाशगंगेमध्ये ३० परग्रहवासी जीवसृष्टींचे अस्तित्व असू शकते असं म्हटलं आहे. आपल्या आकाशगंगेमध्ये किती ग्रहांवर सजीवसृष्टी असू शकते यासंदर्भातील उत्तर शोधण्याचा प्रयत्न संशोधकांनी केला आहे. पृथ्वीवर ज्या पद्धतीने जीवसृष्टीची निर्मिती झाली त्या परिस्थितीशी तुलना करुन आकाशगंगेमध्ये परग्रहवासीयांच्या किती वसाहती असू शकतील याचा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. एका नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार आपल्या आकाशगंगेमध्येच अनेक परग्रहवासीय असतील. आपण त्यांचा किंवा त्यांनी आपला शोध घेण्याचा अवकाश केवळ बाकी आहे असं म्हटलं आहे.

नक्की वाचा >> गणित चुकलं… २०१२ नाही जून २०२० मध्ये होणार जगाचा अंत; तारीखही केली जाहीर

नॉर्टींगहम विद्यापिठातील खगोलशास्त्र विषयाचे प्राध्यापक ख्रिस्तोफऱ कन्सीलीस यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आलं. “आपल्या आकाशगंगेमध्येच परग्रहवासीयांच्या काही डझन वसाहती असतील. एका ग्रहावर विद्वान आणि बृद्धीमान जीवसृष्टी तयार होण्यासाठी ५०० कोटी वर्षांचा कालावधी लागतो. पृथ्वीवरही जवळजवळ इतकेच वर्षांनंतर आजचा मानव अस्तित्वात आला. प्रचंड मोठ्या अंतराळामध्ये म्हणजेच कॉस्मिक स्केलवर विचार केल्यास किती जीवसृष्टी असतील याचा अंदाज बांधण्याचा आम्ही प्रयत्न केला. या गणिताला आम्ही तांत्रिक भाषेमध्ये अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिकल कोपर्निकन लिमीट असं म्हणतो,” असी माहिती कान्सीलीस यांनी दिली.

हा अहवाल लिहिणारे संशोधक टॉम वेस्टबे यांच्या म्हणण्यानुसार अवकाशामध्ये परग्रहावर किती ठिकाणी जीवसृष्टी अस्तित्वात असेल याचा अंदाज बांधण्याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे जीवसृष्टीसाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करणे. मात्र अशा विषयांवर अनेक मतभेद निर्माण होऊ शकता. मात्र या संशोधकांनी एकत्रितपणे अभ्यास करुन सर्व शक्यता लक्षात घेत सादर केलेल्या अहवालामध्ये त्यांनी आपल्या आकाश गंगेमधील अंदाजित वसाहतींबद्दल भाष्य केलं आहे.

“दोन अ‍ॅस्ट्रोबायोलॉजिकल कोपर्निकन लिमीट म्हणजे ५०० कोटी वर्षांचा कालावधी किंवा त्यानंतर सुरु होणार कालावधी. पृथ्वीवरही आजचा मानव निर्माण होण्यासाठी ४५० कोटी वर्ष लागली. सुर्यामध्ये असणाऱ्या धातू इतका साठा असणाऱ्या ताऱ्यांचा आम्ही शोध घेतला. याच शोधाच्या आधारे आम्ही केलेला अभ्यास आणि गणितानुसार आपल्या आकाशगंगेमध्ये अंदाजे ३६ वसाहती अस्तित्वात असणार असं आम्हाला वाटतं,” अशी माहिती टॉम यांनी दिली.

अवकाशामध्ये आढळून येणाऱ्या सिग्नल्सच्या आधारे एलियन्सच्या किती वसाहती असू शकतात याचा अंदाज बांधता येतो. या वसाहतींमधील बुद्धीमान प्राण्यांचे आयुष्यमान मानवाप्रमाणे १०० वर्षाचे असल्याचे गृहित धरल्यास सध्याच्या काळात एकाच वेळी आकाशगंगेमध्ये ३० बुद्धजीवी वसाहती अस्तित्वात असतील असा दावा या अभ्यास करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> २०२० मध्ये एलियनही सापडणार? चीनच्या नव्या मोहिमेला सप्टेंबरपासून सुरुवात

दोन सजीव सृष्टींमधील अंदाजे अंतर १७ हजार प्रकाशवर्ष इतके असण्याची शक्यताही संशोधकांनी व्यक्त केली आहे. सध्या आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या आधारे एवढ्या दूरवर संपर्क करणे शक्य नसल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. मात्र त्याचवेळी आपण त्यांचा शोध घेऊ या भितीने तेथील सजीवसृष्टी नष्ट झाल्याची शक्यताही या अहवालात व्यक्त करण्यात आली असून त्यामुळे आपण एकटेच आपल्या आकाशगंगेमध्ये असू शकतो असंही म्हटलं आहे.

“जर आपल्याप्रमाणेच इतर ठिकाणी सजीव सृष्टी आहे असं सिद्ध झालं तर पुढील काही शतकांपेक्षा अधिक काळ आपले अस्तित्व टिकून राहिल. मात्र अशाप्रकारची कोणतीही सजीवसृष्टी अस्तीत्वात नसल्याचे आढळून आले तर आपल्या स्वत:च्या अस्तित्वासंदर्भात हा एक वाईट संकेत असेल. एलियन्सचा शोध घेत परग्रहावर खरोखर जीवसृष्टी आहे हा हे शोधताना एकप्रकारे आपण आपल्याचा भविष्याचा शोध घेत आहोत,” असं या अहवालाच्या शेवटी कन्सीलीस यांनी म्हटलं आहे.