गारांचा पाऊस, पैशांचा पाऊस, कृत्रिम पाऊस असे शब्द आपण अनेकदा ऐकत आलोय पण रशियामध्ये चक्क सोन्याचा पाऊस पडला आहे. त्याचं झालं असं की रशियातील सोनं, इतर मौल्यवान धातू आणि हिरे वाहून नेणाऱ्या विमानाचा दरवाजा उघडा राहिल्यानं विमानातून तब्बल थोड थोडकं नाही तर नऊ टन सोनं आणि इतर मौल्यावान गोष्टी खाली पडल्या त्यामुळे आभाळातून अक्षरश: सोन्याचा पाऊसच पडत होता.

निंम्बस एअर लाईन्सचे एएन-१२ हे विमान ९ टन सोनं आणि इतर मौल्यवान वस्तू वाहून नेत होतं. रशियाच्या याकुस्क विमानतळावर धावपट्टीवरून उड्डाण घेत असताना या विमानाचं दार उघडं राहिल्याचं स्थानिक वृत्तपत्रांनी म्हटलं आहे. या एका चुकीमुळे विमानानं उड्डाण घेतल्यानंतर सोने, हिरे आणि इतर मौल्यावान वस्तू विमानातून खाली पडल्या. त्यानंतर एका गावात विमानाची एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. या मौल्यवान वस्तूंची किंमत अब्जावधींच्या घरात जाते. आतापर्यंत १७० सोन्याच्या विटा परत मिळवण्यास यश आलं आहे. ९ टन पैकी साडेतीन टन सोन्याचा शोध लागला आहे उर्वरित सोनं आणि मौल्यवान वस्तूंचा शोध सुरू आहे.