इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रस्थामुळे हळूहळू भारतीय भाषांचं महत्त्व कमी होत चाललं आहे , हे आपण नेहमी पाहतो, ऐकतो, वाचतो. मातृभाषा येत असल्याचा अभिमान वाटण्यापेक्षा अनेकांना इंग्रजी येत नाही याचा न्यूनगंड अधिक असतो. खरं तर इंग्रजी ही आंतरराष्ट्रीय भाषा आहे. ती शिकण्याचा अट्टहास करण्यात काही गैर नाही पण त्याचबरोबर आपल्या मातृभाषेचाही अभिमान प्रत्येकानं बाळगला पाहिजे हेही तितकेच खरे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजीजू यांनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. ‘या विदेशी व्यक्तीला माझा सलाम, मातृभाषेत माणूस लेखन किंवा विचार करत नाही तोपर्यंत त्या देशाचा विकास संभव नाही. जर तुमचं भारतावर खरंच प्रेम असेल तर खूप कमी कालावधीत तुम्ही इथली कोणतीही भाषा अगदी सहज शिकू शकता आणि अस्खलित बोलू शकता’ असं म्हणत रिजीजू यांनी या विदेशी माणसाचं कौतुक केलं आहे. व्हिडिओमधील व्यक्तीचं नाव समजू शकलं नाही मात्र १९७२ ते १९७८ या काळात भारतातील बिहार, लखनऊ, उत्तर प्रदेशमध्ये राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. या काळात त्यांनी भोजपूरी भाषा शिकली असंही ते म्हणाले.

इतंकच नाही तर त्यांनी स्वत:ला भारतीय देखील म्हटलं आहे. दुसऱ्या एका मुलाखतीत त्यांनी दोन भारतीय महिलांना हिंदीत काही प्रश्न विचारले अर्थात याची उत्तर त्यांनी इंग्रजीत दिली. त्यावेळी मी तुमच्याशी हिंदीत बोलत असताना तुम्ही मात्र इंग्रजीत का बोलत आहात? असा प्रश्न विचारून त्यांना मध्ये टोकलं देखील.  हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जर एका परदेशी माणसाला भारतीय भाषेचा अभिमान वाटत असेल तर आपण भारतीयांना तो का नाही? असाही प्रश्न अनेकजण यातून विचारत आहे.