OTT प्लॅटफॉर्मवर धुमाकूळ घालणारी वेबसीरिज मिर्झापूर दर्शकांच्या चांगलीच पसंतीस पडली. या वेबसीरिजचे दोन्ही भाग एकदा नाही तर अनेकदा बघणारेही बरेचजण आहेत. ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सुपरहिट ठरलेली ही वेबसीरिज खऱ्या जीवनात एका तरुणासाठी मात्र डोकेदुखी ठरत आहे.
मिर्झापूर नावाचा उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या नावानेच ही वेबसीरिज बनवण्यात आली. सीरिजमध्ये शिवीगाळ, गुंडांची दादागिरी अशी प्रतिमा दाखवण्यात आली आहे. पडद्यावर प्रेक्षकांना तिथली भाषा, बोलण्याची पद्धत वगैरे भावली. पण खऱ्या आयुष्यात मात्र एका तरुणाला फक्त मिर्झापूरचा असल्यामुळे नोकरी नाकारण्यात आल्याचं समोर आलंय.
निर्मात्यांविरोधात तक्रार :-
मिर्झापूरचा रहिवासी दीपू प्रजापती नावाच्या तरुणासोबत ही घटना घडली. दीपू नोकरीच्या शोधात मुंबईमध्ये रेस्तराँ चेन चालवणाऱ्या कंपनीत मुलाखतीसाठी गेला होता. पण त्याचा बायोडेटा बघून तू मिर्झापूरचा आहेस का असा पहिला प्रश्न त्याला विचारण्यात आला. दिपूने हो उत्तर देताच मुलाखत घेणारा मॅनेजर संतापला आणि मग इथे कशाला आला आहेस…जा मिर्झापूरमध्ये जाऊनच गुंडागर्दी कर असं म्हणत त्याला नोकरी नाकारली. नवभारत टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत दिपूने ही माहिती दिली.
आणखी वाचा- भारतीय रेस्तराँ मालकाने अंतराळात पाठवला समोसा…फ्रान्समध्ये झालं क्रॅश लँण्डिंग…बघा Video
पंतप्रधानांना विनंती :-
दीपू प्रजापतीने या घटनेनंतर मिर्झापूर वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात मिर्झापूर पोलीस अधिक्षकांकडे लेखी तक्रार केली आहे. तसेच वेबसीरिजचं नाव बदलण्याची मागणीही त्याने केली. त्याची तक्रार ऐकून पोलिसही हैराण झाले. जिल्ह्याची प्रतिमा डागाळत असल्याने निर्मात्यांवर कारवाई करावी अशी मागणी करणारं पत्र त्याने राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनाही लिहिलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 12:48 pm