H2O म्हणजे काय, या माध्यमिक शाळेतल्या रसायनशास्त्राच्या प्रश्नाचं उत्तर सर्वसामान्यांनाही माहित असेल. हाच प्रश्न ‘मिस वर्ल्ड बांगलादेश २०१८’ या सौंदर्यस्पर्धेत एका स्पर्धकाला विचारण्यात आला. या प्रश्नाला तिने दिलेलं उत्तर ऐकून प्रेक्षकांसोबतच परीक्षकसुद्धा अवाक् झाले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अर्थात तो व्हायरल होण्यामागचं कारण आहे त्या महिलेचं भन्नाट उत्तर.

परीक्षकांनी त्या स्पर्धकाला H2Oचा अर्थ काय हा सामान्य प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकताच तिच्या कपाळाला आठ्या पडल्या आणि H2O हाच फॉर्म्युला तीन दोन वेळा बोलली. तिला उत्तर माहित नसल्याचं कळताच अखेर परीक्षकांनी स्वत: त्याचा अर्थ ‘पाणी’ असल्याचं सांगितलं. मात्र स्वत:चा बचाव करण्यासाठी त्या महिलेने H2O या नावाने ढाकामध्ये रेस्तराँसुद्धा असल्याचं सांगितलं.

तिच्या या सारवासारवने परीक्षकसुद्धा थक्क झाले. इतकंच नव्हे तर तुला रेस्तराँ माहित आहे पण त्याचं उत्तर ‘पाणी’ आहे हे माहित नव्हतं का, असा टोलासुद्धा परीक्षकांनी लगावला.