कोलकाताच्या प्रत्येक रस्त्यावर अल्पवयीन मुलींची  तस्करी रोखण्यासाठी जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली होती. गेल्या काही वर्षभरात या शहरातून देहविक्रेयसाठी लहान मुलींना पळवून नेण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि अनेक स्वयंसेवी संस्था प्रयत्नशील आहेत. नगरिकांनीदेखील पुढे येऊन मदत करण्याचा प्रयत्न करावा असं आवाहन पोलिसांनी जाहिरातीतून केलं आहे. मात्र याच मोहिमेची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

कोलाकातामध्ये राहणाऱ्या एका तरूणीनं काही फोटो शेअर केले आहेत ज्यामधून लोकांची हिनं मानसिकता समोर आली आहे. २०१४ पासून कोलकातासह देशभरातील काही महत्त्वाच्या शहरात ‘The Missing Public Art Project’ सुरू आहे. लहान मुलींना पळवून नेलं जातं तसेच त्यांना बळजबरीनं देहविक्रेय करण्यास भाग पाडलं जातं अशा मुलींची सुटका करणं किंवा असे प्रकार पोलिसांच्या तातडीनं निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न ‘The Missing Public Art Project’ द्वारे केला जातो. याद्वारे मोठ्या प्रमाणात समाजात जनजागृती केली जाते. या मोहिमेचा एक भाग म्हणून शहरातील भिंतीवर पोलिसांचा क्रमांक लिहण्यात आला आहे. त्याचबरोबर बाजूला लहान मुलीची सावली रेखाटण्यात आली आहे. मात्र या चित्राची कशा प्रकारे समाजातील काही विकृत मानसिकतेच्या व्यक्तींकडून विटंबना केली जात आहे हे अरित्रा पॉल या तरुणीनं दाखवून दिलं.

एकीकडे आपण या मुलींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र दुसरीकडे समजातील लोक त्याच मनासिकतेत अडकले आहे. जोपर्यंत समजातील लोकांची ही विकृती बदलत नाही तोपर्यंत आपण सुधारण करूच शकत नाही असं मत पॉलनं आपल्या फेसबुक पोस्टमधून मांडलं आहे. हा गंभीर विषय आहे मात्र अशाप्रकारे एखाद्या मुलीच्या चित्राची विटंबना करणं हे कृत्य माणूसकीला शोभत नाही. अशा शब्दात तिनं या कृत्यावर नाराजी दर्शवली आहे.