मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या किंमतीवरून मुंबई हायकोर्टाने फटकारले होते. त्यानंतर राज्य सरकारने मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर यावरून बऱ्याच प्रतिक्रिया येत असून बरेच मीम्स व्हायरल होत आहेत. अनेकांनी या निर्णयाचं स्वागत केलं असून त्यावरून गमतीशीर पोस्ट केले आहेत तर काहींनी बाहेरून खाद्यपदार्थ नेल्यास थिएटरमध्ये होणारा कचरा आणि इतर गोष्टी यावरून उपरोधिक मीम्स पोस्ट केले आहेत. त्यामुळे मल्टिप्लेक्समध्ये बाहेरून खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्यावरून सोशल मीडियावर संमीश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मुंबईसह राज्यभरातील मल्टिप्लेक्स थिएटरमधील खाद्यपदार्थांच्या किंमतींवर राज्य सरकारचं नियंत्रण का नाही? पाच रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांत विकण्याचा अधिकार यांना कुणी दिला असा सवाल करत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. त्यानंतर राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही आणि बंदी करणाऱ्या मल्टिप्लेक्स प्रशासनावर कारवाई केली जाईल, अशी घोषणा अशी माहिती अन्न व पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली. १ ऑगस्टपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही मजेशीर पोस्ट पाहुयात..