विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून जवळजवळ महिना होत आला तरी राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटलेला नाही. सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपा आणि मित्रपक्ष शिवसेनेमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन बिनसल्याने बुहमतानंतरही युतीचे सरकार राज्यामध्ये स्थापन झाले नाही. त्यानंतर आता मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे सरकार स्थापन करण्याच्या हलचाली सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र मागील महिन्याभरापासून राज्यात सुरु असलेले चर्चेचे गुऱ्हाळ पाहून नेटकरी अगदीच वैतागले आहेत. अनेकांनी या सत्तास्थापनेवरुन मिम्स व्हायरल केले आहेत तर अनेकांनी राजकारण्यांना कोपरखळ्या लगावल्या आहेत. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विटवरुन फुटबॉलच्या मैदानातील एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे.

अमेय खोपकर यांनी शेअर केलेल्या व्हिडिओला “हा शरद पवार स्टाइल गोल आहे,” अशी कॅप्शन दिली आहे. तसेच हा व्हिडिओ तुम्ही नक्की दोनदा पाहाल असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये

या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती गोल करण्याचा प्रयत्न करते. मात्र त्याची किक बॉलला न लागता हुकते आणि तो गोल फिरतो. मात्र गोल फिरुन पाय जमीनीवर टेकवताना तो फुटबॉलला लागतो आणि गोल होतो.

पवारांची बुचकळ्यात टाकणारी विधाने

शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी अद्यापही स्पष्ट भूमिका घेतलेली नसतानाच, सत्तास्थापनेबाबत भाजपला विचारा आणि सोनियांशी सत्तास्थापण्याच्या मुद्यावर चर्चाच झालेली नाही, अशी बुचकळ्यात टाकणारी विधाने राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केली. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली. राज्यात सरकार स्थापण्याबाबत शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी १०, जनपथवर जाऊन सोनिया गांधी यांची भेट घेतली. सुमारे पाऊण तास उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. या वेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अ‍ॅन्टोनी हे उपस्थित होते. राज्यातील राजकीय परिस्थितीची माहिती आपण सोनिया गांधी यांना दिली. राज्यात सत्ता स्थापन करण्याबाबत या भेटीत कोणतीही चर्चा झाली नाही. सोनियांशी दोन्ही काँग्रेसबाबत चर्चा झाली. त्यात शिवसेनेशी आघाडी करून सरकार स्थापण्याचा विषयच निघाला नाही, असे पवार यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी सरकार स्थापण्यासाठी किमान समान कार्यक्रम ठरला असल्याचे सोमवारी दुपारी जाहीर केले होते. पण, असा कोणताही कार्यक्रम ठरलेला नाही, असे सांगत पवारांनी किमान समान कार्यक्रमाची चर्चाच पूर्णत: नाकारली. पवारांच्या या भूमिकेने संभ्रम आणखी वाढला.