महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते नितीन नांदगावकर यांचा एक व्हिडिओ फेसबुकवर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नांदगावकर यांच्या हस्ते एका तरुणाला दिव्यांगांची सायकल भेट देताना दिसत आहेत. नांदगावकर यांच्या फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओनुसार माहिमच्या दर्ग्याजवळ भीक मागणाऱ्या तरुणाला स्वावलंबी बनवण्यासाठी ही सायकल भेट देण्यात आल्याचे म्हटले आहे.

आपल्या रोख’ठोक’ भुकेसाठी नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय असणारे नांदगावकर हे व्हिडिओमध्ये फुग्यांनी सजवलेली दिव्यांगांची सायकल सचीन नावाच्या तरुणाला भेट देताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्याच्या कॅप्शनमध्ये ‘मै सिर्फ जरिया हूँ देने वाले हजारो हात है’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. नांदगावकर यांनी ही सायकल दिली नसून ती दुसऱ्या एका व्यक्तीने दिली असल्याचे नांदगावकर व्हिडिओत सांगतात.

कोण आहे हा मुलगा

या व्हिडिओत दिसणारा सचीन हा दिव्यांग तरुण माहिमच्या दर्ग्याजवळ भीक मागायचा. ट्रेन अपघातामध्ये दोन्ही पाय गमावल्याने त्याला भिक मागून पोट भरावे लागत होते. ही गोष्ट नांदगावकर यांना समजल्यानंतर त्यांनी या मुलासाठी सायकल दान करण्यासंदर्भात सोशल मिडियाच्या माध्यमातून आवाहन केले. या आवाहनाला चांगला प्रतिसाद आला. शंभरहून अधिक लोकांनी सचीनला सायकल देण्याची तयारी दाखवली. अखेर नांदगावकर यांनी लकी ड्रॉच्या माध्यमातून अमय तावडे या वसईतील मुलाची निवड करुन त्याने दिलेली सायकल स्वत:च्या हस्ते सचिनला दिली. ‘ज्यांची मेहनत करण्याची तयारी असते त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई आहे. म्हणूनच तुला सायकल देण्यासाठी मला शंभरहून अधिक मेसेजेस आले,’ असं नांदगावकर यांनी सचिनला सांगितले.

या पुढे भिक मागताना दिसला तर

‘जर मला तू या पुढे भीक मागताना दिसला तर या सायकलचा उपयोग झाला नाही असं समजेल. तुला भीक मागूनच पैसा कमावायचा असेल तर ते तुझ्यावर’ असं नांदगावकर म्हणताच सचिनने या सायकलच्या मदतीने काहीतरी विक्री करुन पैसे कमावणार असल्याचे सांगितले. ‘या पुढे आपण भिक मागणार नसून भाजी विकण्याची आपली इच्छा आहे’, असं सचिनने नांदगावकर यांना सांगितले. नांदगावकर यांनीही त्यासाठीही सायकलमध्ये बदल करुन एक स्टॅण्ड लावून देण्याचे आश्वासन दिले. दिव्यामध्ये राहणाऱ्या सचिनला दिव्यात येऊन स्टॉल उभारणीसाठी आपण नक्की मदत करु असंही नांदगावकर यांनी सचिन आणि त्याच्या आईला सांगितले. सचिन याने नांदगावकर यांना ही सायकलही चालवून दाखवल्याचे या व्हिडिओत दिसते.

व्हिडिओमध्ये कागदोपत्री पुर्तता झाल्यानंतर तुझ्या घराचा प्रश्नही मार्गी लावू असं आश्वासनही नांदगावकर यांनी सचिनला आणि त्याच्या आईला दिले आहे. ‘शेवटपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे’ असंही नांदगावकर यांनी सचिनला सांगितले. नांदगावकर आणि त्यांच्या टीमने सचिनचा निरोप घेण्याआधी त्याच्याबरोबर आवर्जून फोटो काढून घेतले.