आठवडाभरात वाहतूक पोलिसांसोबत बाचाबाची आणि त्यांना मारहाण झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यावर मनसे वाहतूक सेनेचे सरचिटणीस नितीन नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दरम्यान, यासंदर्भात त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. पोलिसांच्या गणवेशाला हात लावण्याची कोणाची हिंमत कशी होते? असा सवाल त्यांनी यावेळी केला. पोलिसांची भिती जर कमी होत चालली हे कसं चालेल? अशा लोकांना रस्त्यात फोडून काढले पाहिजे. अशा समाजकंटकांना पोलिस ठोकणार का मी ठोकू? असा सवाल त्यांनी यावेळी केला.

मुंब्र्यात दोन दिवसांपूर्वीच काही मुलांनी वाहतूक पोलिसावर हात उचलला होता. त्यावेळी वाहूतक पोलिसाच्या इतर सहकाऱ्यांपैकी अन्य कोणी त्यांना का हिसका दाखवला नाही. तसेच त्या ठिकाणी असलेल्या लोकांनीही मदत न करता बघ्यांची भूमिका घेतली असल्याचं सांगत नांदगावकर यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांवर हात उचलणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. मुंबईत पोलिसांबद्दल जर कोणी आदर निर्माण करू शकत नसेल तर त्यांची भिती तरी निर्माण झाली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

जे पोलीस रात्रंदिवस जनतेची सेवा करतात त्यांच्या मदतीला कोणीच जात नाही. त्याऐवजी ते फोटो, व्हिडीओ काढत बसतात ही शोकांतिका आहे. जर पोलिसांवर हात उचलण्याची कोणाची हिंमत होत असेल तर त्यांची रस्त्यांवर धिंड काढली पाहिजे. मुंबईत पोलिसांचा मान सन्मान हा ठेवलाच पाहिजे. पोलिसांनी स्वत:च्या मनोबलाचं खच्चीकरण करून घेऊ नये. यापुढे जर कोणी पोलिसांवर हात टाकला तर तो यापुढे माझा वैयक्तिक शत्रू असेल आणि त्यानंतर काय आपण काय करू हेदेखील सांगू शकत नसल्याचंही ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.