भारतासह जगभरातील अनेक देशातील नागरिकांना ‘रिंग ऑफ फायर’ अर्थात कंकणाकृती सूर्यग्रहणाचे विलोभनीय दृश्य बघण्याची संधी मिळाली. अनेकांनी हा ग्रहण डोळ्यात साठवून घेतलं. पंतप्रधान नरेंद्र मोदीही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होते. त्यांनी तयारीही केली. पण, ऐनवेळी पंतप्रधानांना लाईव्ह प्रक्षेपणाद्वारेच सूर्यग्रहण बघावे लागले. इतर भारतीयांप्रमाणेच आपणही हे सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो, पण दुर्दैवानं बघता आले नाही, असं म्हणत मोदींनी नाराजीही व्यक्त केली. हे ट्विट करताना मोदींनी स्वत:चे काही फोटोही पोस्ट केले. या फोटोंवरुन अनेकांनी मीम्सही तयार केले. मात्र काही नेटकऱ्यांनी थेट पंतप्रधान मोदींनी या फोटोंमध्ये घातलेल्या गॉगलची किंमत शोधून काढली आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये ते गळ्यामध्ये लाल स्कार्फ घालून गॉगल लावून ग्रहण पाहताना दिसत आहेत. या फोटोवरुन नेटकऱ्यांनी मोदींनी कोणत्या ब्रॅण्डचा गॉगल घातला आहे हे शोधून काढल्याचा दावा केला आहे. अनेकांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. अनेकांनी मोदींचा हा गॉगल जुनाच असल्याच्या बातम्याही शोधून काढल्या आहेत.

कितीचा आहे हा गॉगल

या फोटोमध्ये मोदींनी घातलेला गॉगल हा मायबॅच आयवेअर या जर्मन कंपनीचा आहे. हा एक महागडा परदेशी ब्रॅण्ड असून त्याची किंमत हजारोंमध्ये असते. मात्र मोदींचा गॉगल हा ‘द डिप्लोमॅट वन’ प्रकारातील आहे. या गॉगलची किंमत २ हजार १५९ डॉलर आहे. म्हणजेच भारतीय चलनानुसार या गॉगलची किंमत दीड लाखांहून अधिक आहे. आजच्या डॉलरच्या किंमतीनुसार या गॉगलची किंमत एक लाख ५४ हजार ३०३ रुपये इतकी आहे. हा गॉगल भारतामध्ये मागवायचा झाल्यास त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागतात असं नेटकऱ्याचं म्हणणं आहे. त्यामुळे या गॉगलची भारतातील किंमत ही एक लाख ६० हजारांच्या आसपास असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.

तर काही मोदी समर्थकांनी हा इतका महागडा गॉगल नसून तो ‘रेट्रो बफेलो हॉर्न ग्लासेस’ हा गॉगल असल्याचा दावा केला आहे. हा गॉगल सात ते दहा हाजारांमध्ये उपलब्ध असल्याचे मोदी समर्थकांनी म्हटलं आहे.

 

याआधीही मोदी केदारनाथ दौऱ्यावर असताना मोदींनी बुल्गेरी ग्लासेस या इटायलियन ब्रॅण्डचा गॉगल घातला होता त्यावरुन वाद निर्माण झाला होता. मोदींनी धार्मिक स्थळांवर जाताना मोदींनी हा गॉगल घातल्याने काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली होती.