पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री झाली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. या भेटीकडं आख्ख्या जगाचं लक्ष लागलं होतं. मीडियावरही याच भेटीची चर्चा होती. त्याचदरम्यान, व्हाईट हाऊससमोरील एका अनपेक्षित घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. अलिशान कारमधून आलेल्या मोदींच्या स्वागतासाठी सुरक्षारक्षक तैनात होते. त्यातील एका सुरक्षारक्षकाच्या कृतीनं त्यालाच चुकल्या-चुकल्यासारखं झालं.

मोदी आपल्या अलिशान कारमधून व्हाईट हाऊसच्या इमारतीसमोर पोहोचले. कारचा दरवाजा उघडण्यासाठी दोन सुरक्षारक्षक कारच्या बाजूला उभे राहिले. पलिकडे डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यादेखील स्वागतासाठी उभ्या होत्या. मोदी हे अमेरिकेत कदाचित सहपत्नीक आले असावेत, असं सुरक्षारक्षकांना वाटलं म्हणून कारच्या दोन्ही बाजूचे दरवाजे उघडण्यासाठी सुरक्षारक्षक पुढे आले. शिष्टाचार म्हणून सुरक्षारक्षकांनी दोन्ही बाजूंचे दरवाजे उघडले. पण मोदी हे एकटेच आले आहेत ही बाब त्यांच्या लक्षात आली आणि त्यांनाच चुकल्यासारखं वाटलं. सुरक्षारक्षाकांच्या उडालेल्या या गोंधळाचा सारा प्रकार कॅमेरात कैद झालाय. ही व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतेय.