भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद कैफच्या सूर्य नमस्काराची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या मोहम्मद कैफने आरोग्याविषयक सल्ले देताना सूर्य नमस्कार घालणे हा सर्वोत्तम व्यायाम असल्याचे म्हटले होते. उत्तम आरोग्यासाठी हा सल्ला देत असताना कैफने सूर्य नमस्कार करतानाचे काही फोटो ट्विटरवरुन शेअर केले आहेत. कैफचा फोटोतील अंदाज काही मुस्लीम कट्टर पंथियांना अजिबात रुचलेला नाही. त्यामुळे काही कट्टरपंथियांनी कैफवर निशाणा साधला. मुस्लीम असून सूर्यनमस्कार करणे इस्लामविरोधात असल्याचे कैफला त्यांनी फैलावर घेतले. कट्टरपंथियांनी केलेल्या  टिकेनंतर सध्या सोशल मीडियावर कैफच्या समर्थनाचे वारे वाहू लागले आहे.

नमाज अदा करतानाचा एखादा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे का? असा प्रश्न एका नेटीझन्सने कैफला विचारला आहे. तर अल्लाशिवाय अन्य कोणासमोरही झुकायचे नाही, असे सांगत एकाने कैफला सूर्यनमस्कार घालणे चुक असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. सूर्य नमस्कार करतानाच्या कैफच्या कैफच्या फोटोवर उमटलेल्या नाराज प्रतिक्रियानंतर त्याच्या समर्थनार्थ देखील काही नेटीझन्सपुढे आले आहेत. लोक काही तरी म्हणणारचं…त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नये, असे एका नेटीझन्सने म्हटले आहे. तर तुमच्या सारखे लोक प्रेरणादायी असतात असे ट्विट एका चाहत्यांने केले आहे. २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या योग दिनादिवशी मुस्लीम समुदायामध्ये योगाबाबतचे गैरसमजाचे मळभ दूर करण्यासाठी प्रयत्न देखील करण्यात आले होते.

यापूर्वी भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे संकटात सापडला होता.  मोहमद शमीने त्याच्या पत्नीसोबतचा एक फोटो फेसबुकवरुन शेअर केला होता. या फोटोमध्ये तो आपल्या पत्नीच्या खांद्यावर हात टाकून बसल्याचे दिसते. फोटोमध्ये त्याच्या पत्नीने आखूड बाह्यांचा ड्रेस परिधान केल्यामुळे नेटीझन्स शमीवर प्रतिक्रियांचे बाऊन्सर मारले होते. शमीच्या फेसबुकवरील या फोटोवर अनेकजणांनी शमीवर हल्ला चढविला होता. सर तुम्ही मुस्लिम आहात…तुमच्या पत्नीला बुरख्यामध्ये ठेवायला हवे, अशा प्रकारच्या प्रतिक्रियांचा सामना शमीला करावा लागत होता. मुस्लिम असून तुम्ही अशा प्रकारचा फोटो शेअर करणे खेदजनक आहे. असेही नेटीझन्स म्हटले होते.