माणसानंतर जर कोणता प्राणी हुशार असेल तर तो म्हणजे माकड. एक माकड असूनही तो अनेक गोष्टी शिताफीने करतो. याची अनेक उदाहरणंही आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सध्याचं जग हे सोशल मीडियाचं आहे त्यामुळे या जगात कोणतीही गोष्ट कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही. काही दिवसापूर्वी कपडे धुणाऱ्या, जेवणाच्या पंक्तीत बसणाऱ्या आणि पाणी वाचविण्याचा संदेश देणाऱ्या काही माकडांचे व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. त्यातच आता आणखी एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील माकड चक्क एका पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात उवा शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.

व्हायरल होत असलेला व्हिडीओ उत्तर प्रदेशमधील असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. उत्तर प्रदेशमधील पीलीभीत जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये एक पोलीस अधिकारी काम करत असताना अचानक एक माकड त्यांच्या खांद्यावर येऊन बसलं आणि त्याने पोलिसांच्या डोक्यामध्ये उवा शोधण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे हे दोघंही त्यांचं काम करण्यात प्रचंड मग्न होते.

 वाचा : पुण्यात झोमॅटो बॉयचा प्रताप, ग्राहकाच्या कुत्र्याला घेऊन पसार

वाचा : ‘हे’ आहेत जमिनीवर बसून जेवायचे फायदे

‘पीलीभीतच्या या पोलीस अधिकाऱ्यांच्या अनुभवावरुन हे स्पष्ट होतं की, जर तुम्हाला कामात अडथळा येऊ द्यायचा नसेल तर रिठा, शिकेकाई किंवा एखादा चांगला शाम्पू वापरा!’, असं कॅप्शन राहुल श्रीवास्तव यांनी हा व्हिडीओ शेअर करत दिलं आहे. दरम्यान, या व्हिडीओला १६ हजारांपेक्षा अधिक व्ह्युज मिळाले असून १४ हजारांपेक्षा अधिक जणांनी लाईक केलं आहे.