तुफान प्रसिद्धी मिळालेला माकडाचा हा सेल्फी गेल्या काही वर्षांपासून वादात सापडला आहे. माकडाच्या सेल्फीवर कॉपीराईट्स नेमके कोणाचे? त्याचे? की फोटोग्राफर्सचे? यावरून मोठा वाद सुरू होता. हा सेल्फी माकडाचा असल्यानं यावर त्याचा हक्क आहे. तसेच यातून मिळणारी कमाईही त्याच्याच मालकीची आहे असा दावा ‘पेटा’नं केला होता तर फोटोग्राफर डेव्हिड स्लॅटरनं मात्र हा फोटो मी काढला असल्यानं त्यावर केवळ माझा हक्क आहे अशी भूमिका मांडली होती.

आता या वादावर महत्त्वपूर्ण निकाल कोर्टानं दिला असून एखादा प्राणी स्वामित्त्वाचा हक्क सांगू शकत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे. माकडाला स्वामित्व हक्काचा दावा करता येईल अशी काही घटनात्मक तरतूद नसल्याचं कोर्टानं स्पष्ट केलं आहे. अमेरिकी सर्किट कोर्टाच्या निर्देशांनुसार स्वामित्व हक्क कायद्यामध्ये हक्कभंग झाल्याची तक्रार करण्याचा अधिकार प्राण्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे नरूटा माकड यावर स्वामित्त्व हक्क सांगू शकत नाही असं कोर्टानं म्हटलं आहे.

२०११ मध्ये इंडोनेशियातील जंगलात स्लॅटरयांच्या कॅमेरातून माकडानेच हा फोटो टिपला होता. ‘मंकी सेल्फी’ नावाने या फोटोने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. नरुटा माकड हे इंडोनेशियातल्या दुर्मिळ प्रजातीचं माकड आहे. स्लॅटर माकाडाच्या फोटोवर स्वामित्त्वाचे हक्क सांगत असला तरी हे हक्क नरुटाचे आहेत अशी भूमिका पेटाने मांडली आणि त्यांनी अमेरिकेतील न्यायालयात धाव घेतली होती. २०१५ साली बीबीसीला दिलेल्या मुलाखीत स्लॅटर म्हणाले होते की या फोटोसाठी मी माझा घाम घाळला, रक्त आटवलं होतं. तीन दिवस मी या फोटोसाठी मेहनत करत होतो. माकडांसोबत राहणं, त्यांनी मला स्विकारणं, माझे महागडे कॅमेरा त्यांना हाताळायला देणं ही साधी गोष्ट नाही. त्यासाठी मी मेहनत घेतली आहे असं ते म्हणाले.

२०१५ पासून स्वामित्त्वाच्या हक्कांवरून वाद सुरु होता. गेल्यावर्षी या फोटोच्या कमाईतून आलेली २५ टक्के रक्कम त्याच्या देखभालीसाठी देण्याचं स्लॅटर यांनी मान्य केलं होतं.