गेल्या आठवड्यात रशियातल्या एका तरूणीचा फोटो व्हायरल झाला होता, अनास्तासिया असं तिचं नाव असून हाडं गोठवणाऱ्या थंडीत तिच्या डोळ्याच्या पापण्याही गोठल्या होत्या, थंडीमुळे रशियातल्या अनेक भागात तापमान हे उणे ६० अंश सेल्शिअसच्या खाली पोहोचलं होतं. इतक्या थंडीतही लोक जिवंत राहू शकतात हे प्रथमच या फोटोंमुळे जगातील लोकांना कळलं. पण, ही फक्त रशियातल्या काही भागाची परिस्थिती आहे असं नाही, डिसेंबर २०१७ मध्ये रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये फक्त सहा मिनिटंचं सूर्यदर्शन झालं असल्याचं निरिक्षण तिथल्या हवामान तज्ज्ञांनी नोंदवलं आहे.

डिसेंबर महिन्यात एकदाही पुरेसा सूर्यप्रकाश पडला नाही असं हवामानविषयक घडामोडी सांगणाऱ्या ‘मेटॅनोवॉस्टी’ या पोर्टलनं माहिती दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राजधानीत फक्त सरासरी सहा मिनिटांसाठीच सूर्य दिसला. २००० सालच्या डिसेंबर महिन्यात फक्त ३ तासच सूर्यप्रकाश दिसला होता. गेल्या काही दिवसांपासून मॉस्कोमधलं तापमान हे उणे आठ डिग्री आहे. तर दुसरीकडे रशियातल्या मूरमान्स्क या ठिकाणी तर गेल्या आठवड्यात तब्बल ४० दिवसांनंतर सूर्य उगवला होता. डिसेंबरपासून इथल्या लोकांनी सूर्यदर्शन घेतलं नव्हतं. गेल्या आठवड्यात शेकडो लोक सूर्योदयाचा सर्वोच्च आनंदाचा क्षण अनुभवण्यासाठी सनी माऊंटन इथल्या प्रसिद्ध टेकडीवर जमले. फक्त अर्ध्या तासासाठी येथे सूर्यदर्शन झाले होते.

वाचा : तापमान -७० अंश सेल्सिअस., रशियातल्या ‘या’ गावात असते हाडं गोठवणारी थंडी

वाचा : तब्बल ४० दिवसांनंतर ‘त्या’ शहरात झाला सूर्योदय

वाचा : नुसते फोटो पाहूनही तुम्हाला भरेल हुडहुडी, कारण या शहराचे तापमान आहे उणे ६२ अंश सेल्सियस

ओयमियाकोन गावात तर परिस्थिती याहून बिकट आहे. पाचशेंच्या आसपास लोकसंख्या असलेल्या या गावात गेल्या आठवड्यात तापमान ७० अंश सेल्शियसच्या आसपास खाली उतरलं होतं. पण, तरीही लोक या गावात राहतात आश्चर्य म्हणजे तापमान उणे ४० अंश असलं तरी इथल्या शाळाही सुरु असतात.