आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर दबदबा असलेल्या भारताच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. अहमदाबादच्या मोटेरा मैदानाला आता जगातील सर्वात मोठ्या मैदानाचा सन्मान मिळणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मैदानाचं उद्घाटन होणार आहे. या सोहळ्यासाठी अहमदाबादमध्ये सध्या जय्यत तयारी सुरु आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदान हे जगातलं सर्वात मोठं क्रिकेट मैदान मानलं जात होतं. मात्र एक लाखापेक्षा जास्त आसनक्षमता असलेलं मोटेरा मैदान या यादीत पहिल्या स्थानावर आलेलं आहे.

काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने या मैदानाचा एरिअर फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला होता. नेटकऱ्यांनी या फोटोला चांगलीच पसंती दर्शवली होती. यानंतर आता हे मैदान आतमधून कसं दिसतं हे दाखवणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

जगातली सर्वात मोठी ५ क्रिकेट मैदानं पुढीलप्रमाणे –

१) मोटेरा मैदान, अहमदाबाद (भारत)

२) मेलबर्न मैदान, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)

३) इडन गार्डन्स, कोलकाता (भारत)

४) पर्थ मैदान, पर्थ (ऑस्ट्रेलिया)

५) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदान, हैदराबाद (भारत)