एका लहान गोंडस बाळा जन्माच्यावेळीच प्रेग्नंट आहे असं म्हटलं तर त्यावर कोणाचा विश्वास बसणार नाही ना? पण होय अशी एक घटना कोलंबियामध्ये घडली आहे. येथील एका रुग्णालयामध्ये एका नवजात बाळाच्या पोटामध्ये आणखी एक लहान बाळ असल्याचं आढळून आलं. मात्र डॉक्टरांनी C- section सर्जरी करुन या बाळाच्या पोटातील भ्रूण बाहेर काढलं.

कोलंबिया येथे राहणाऱ्या लॅटिनस या महिलेने काही दिवसांपूर्वी एका लहान मुलीला जन्म दिला. परंतु या लहान मुलीच्या पोटामध्ये आणखी एक बाळ होतं. मात्र डॉक्टरांनी मोठ्या शर्थीने यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करत या चिमुकलीच्या पोटातून भ्रूण बाहेर काढलं आहे. ही चिमुकली सुखरुप असून सध्या ही एकच चर्चा सगळीकडे रंगताना पाहायला मिळत आहे.

‘सूत्रांच्या माहितीनुसार’,लॅटिनस गर्भवती असतांना त्यांनी केलेल्या अल्ट्रासाऊंड टेस्टमध्ये त्यांच्या पोटात दोन भ्रूण असल्याचं निदर्शनास आलं होतं. मात्र या दोन्ही भ्रूणांपैकी एक भ्रूण हे दुसऱ्या भ्रूणाच्या पोटात असल्याचं दिसून आलं. परंतु या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याच्या पोटात असलेल्या भ्रूणाची वाढ झाली नव्हती. त्याचं हृदय आणि मेंदू यांचा विकास झाला नव्हता. त्यामुळेच डॉक्टरांनी या चिमुकलीचं सी-सेक्शन ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी घेतलेल्या निर्णयानंतर या बाळाच्या पोटातील भ्रूण बाहेर काढण्यात आलं. विशेष म्हणजे ही अत्यंत दुर्मिळ अशी घटना आहे.

‘द सन’च्या माहितीनुसार, या चिमुकलीचं नाव इत्जमारा असं असून आता तिची प्रकृती स्थिर आहे. इतकंच नाही तर तिची सी- सर्जरी झाल्यानंतरही भविष्यात तिला कोणतीही अडचण येणार नाही. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, हा एक पॅरासिटीक ट्विन्स (Parasitic Twins) चा प्रकार आहे. या प्रकारच्या केसला फीटस इन फेटू (Fetus in Fetu) असंही म्हटलं जातं.