तमिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नईमध्ये राहणारी रुबी ही महिला आज करोडो महिलांसाठी प्रेरणा आहे. ती लग्नानंतर एक मूल असताना बॉडीबिल्डर झाली इतके आपल्याला माहित आहे. मात्र त्यापलिकडची तिची कहाणी ऐकून तुम्हाला नक्कीच तिचा अभिमान वाटेल. मूल झाल्यावर महिलांचे वजन वाढते, त्याचप्रमाणे रुबीचेही वजन खूप वाढले होते. हे वजन इतके वाढले की तिचा पती आणि कुटुंबातील सर्व लोक तिला वजनावरुन टोमणे मारायचे. अशाप्रकारे टोमणे मारल्यावर एखादी स्त्री खचून जाईल. पण रुबीने मात्र ही गोष्ट सकारात्मक घेतली आणि तिने त्यावर मात करत पुढे जाण्याचे ठरवले. आपल्या जुन्या रुपात पुन्हा येण्यासाठी रुबीने घाम गाळण्यास सुरुवात केली आणि आज आपण तिला बॉडी बिल्डर म्हणून ओळखतो.

रुबी म्हणते, माझ्या वाढत्या वजनामुळे आपल्या पतीचा माझ्यातील रस कमी होत चालला होता. मग आपल्या आरोग्याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल या विचाराने मी चालायला सुरुवात केली. त्यामुळे माझे वजन बरेच आटोक्यात आले. मूल झाल्यानंतर व्यायामासाठी घराबाहेर पडणे काहीसे कठिण व्हायचे मात्र मी माझे ध्येय निश्चित करुन त्या दिशेने प्रयत्न करत राहीले. त्या काळात मी वजन कमी होण्यासाठी काहीही करण्यास तयार होते. रुबी म्हणते, बॉडी बिल्डींग करण्यासाठी खूप पैसा लागतो. आहार आणि वेगवेगळ्या सप्लिमेंटससाठी पैशाची आवश्यकता असते असे ती म्हणते. रुबीला सहा वर्षांचा एक मुलगा असून ती नियमित बॉडी बिल्डींगचा सराव करते.