यापूर्वी आपण क्रिकेट, फुटबॉलचं मैदान असेल किंवा सार्वजनिक जागा असतील अशा अनेक ठिकाणी लोकांनी आपलं प्रेम व्यक्त केल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. संसदेत चर्चेदरम्यान अशी घटना घडली असं जर कोणी सांगितलं तर यावर कोणाचा विश्वासही बसणार नाही. परंतु इटलीच्या संसदेत अशी घटना पहायला मिळाली आहे. संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान एका खासदारानं आपल्या मैत्रीणीला अनोख्या अंदाजात प्रपोज केलं. या घटनेनंतर याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. खासदाराचा हा अनोखा अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरत आहे.

फ्लेवियो डी मुरो असं या खासदाराचं नाव आहे. संसदेत सुरू असलेल्या चर्चासत्रादरम्यान त्यांनी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं. एवढंच नाही तर त्यांनी आपल्या खिशातून अंगठी काढली आणि तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. चर्चासत्रादरम्यान अचानक घडलेला हा प्रकार पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. एवढंच नाही तर त्यांच्या मैत्रीणीनंही लग्नासाठी होकार दिला. त्यानंतर सर्वच खासदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

परंतु अध्यक्ष रॉबर्टो फिको यांनी चर्चासत्रादरम्यान फ्लेवियो डी मुरो यांनी केलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त केली. या प्रकारामुळे नक्कीच मी इंप्रेस झालो आहे. परंतु संसदेच्या कामकाजादरम्यान हा प्रकार योग्य नाही, असं त्यांनी सांगितलं.