भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी काही काळापासून क्रिकेटपासून दूर आहे. २०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आलं. त्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं. आगामी टी २० विश्वचषक आणि धोनीचं वाढतं वय लक्षात घेता त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. पण तरीदेखील धोनीचा चाहतावर्ग मात्र अजिबात कमी झालेला नाही. धोनीला आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १५ वर्षे पूर्ण झाल्याने त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

बांगलादेशविरूद्ध २३ डिसेंबर २००४ ला धोनीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याला कसोटी पदार्पणासाठी जवळपास वर्षभर वाट पाहावी लागली. धोनीने २ डिसेंबर २००५ रोजी श्रीलंकाविरूद्ध पहिली कसोटी खेळली. त्यानंतर पुन्हा तब्बल वर्षभराच्या कालावधीने त्याने १ डिसेंबर २००६ ला टी २० क्रिकेटमध्ये पदार्पण केले. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. कसोटी कारकिर्दीत धोनीने ९० कसोटीत १४४ डावात ४ हजार ८७६ धावा केल्या. त्यात त्याने ६ शतके आणि ३३ अर्धशतके ठोकली.त्याच्या १५ वर्षाच्या यशस्वी क्रिकेट कारकिर्दीसाठी त्याला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, एकदिवसीय किंवा टी २० क्रिकेटमधून धोनीने अद्याप निवृत्ती स्वीकारलेली नाही, पण ९ जुलै २०१९ नंतर धोनी अद्याप मैदानावर उतरलेला नाही. भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर असताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मात्र या दौऱ्यातून माघार घेतली होती. तो भारतीय जवानांसोबत काश्मीर खोऱ्यात गस्त घालत होता. ३१ जुलैपासून त्याने काश्मीर खोऱ्यातील १०६ TA बटालियन (पॅरा) सोबत भारतीय सैन्यात सेवा देण्यास सुरू केली होती. सुमारे २ महिन्यांनंतर तो स्वगृही परतला. पण क्रिकेटपासून तो अद्यापही लांबच आहे.