सध्या देशभरात करोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे सण-समारंभ, सोहळे, धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर साजरे करण्यास मनाई आहे. कृष्णजन्म आणि गोकुळाष्टमीचा उत्साह देशभरात नेहमी दिसतो, पण यावर्षी त्यावर काही अंशी विरजण पडल्याचं चित्र आहे. अशा परिस्थितीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरपासून ते युवराज सिंग साऱ्यांनी कृष्ण जन्माष्टमी आणि दहीहंडीच्या चाहत्यांना सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या.

चेन्नई सुपर किंग्जने मंगळवारी जन्माष्टमीच्या निमित्ताने धोनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत धोनी बासरी वाजवताना दिसत आहे. धोनीचा हा व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने (Chennai Super Kings) आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडिओत धोनीने निळ्या रंगाची जर्सी घातली आहे. सोबतच त्याने गॉगल्स घातले आहेत. तो आपल्याच धुंदीत बासरी वाजवताना दिसतो आहे.

धोनीचा हा बासरीवादनाचा व्हिडीओ जुना असून तो प्रचंड व्हायरल होत आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने CSKने धोनीच्या चाहत्यांना हा व्हिडिओ पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, २२ ऑगस्टला धोनी संघासोबत यूएईला रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. विविध प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, CSKचा संघ २२ ऑगस्टला यूएईला रवाना होणार आहे. यूएईला जाण्यापूर्वी CSKचे एक शिबीर लावले जाणार आहे. त्यामध्ये सर्व खेळाडू सामील होणार आहेत. त्यानंतर BCCIच्या आदेशानुसार दोन कोविड-१९ चाचण्या केल्यानंतरच युएईसाठी उड्डाण केलं जाणार आहे.