अत्यंत चुरशीच्या सामन्यात सॅम बिलिंग्ज आणि शेन वॉटसन यांच्या वादळी फलंदाजीच्या बळावर चेन्नई सुपरकिंग्जने कोलकातावर ५ गडी राखून विजय मिळवला. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्जनी घरच्या मैदानावर खेळताना दुसऱ्यांदा सामना जिंकला. सामना संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक हर्षा भोगले याच्याशी बोलताना धोनीने, षटकार मारल्याने स्टेडियमबाहेर बॉल गेल्यास आयपीएलमध्ये दोन धावा जादा द्यायला हव्यात असं उपहासात्मक विधान केलं.

सामना संपल्यानंतर काय म्हणाला धोनी-
दोन वर्षानंतर पुनरागमन करणं आणि विजय मिळवणं नक्कीच आनंददायी आहे. हा सामना खूपच चुरशीचा झाला, असं सामना संपल्यानंतर माजी क्रिकेटपटू आणि समालोचक हर्षा भोगले याच्याशी बोलताना धोनी म्हणाला. प्रत्येक सामन्यात तुमच्या संघाला एक खेळाडू विजय मिळवून देतोय हर्षा भोगलेच्या या प्रश्नाला उत्तर देताना धोनी म्हणाला, प्रत्येक सामन्यात एक खेळाडू देखील जखमी होत आहे, जर असंच सुरू राहीलं तर 14 सामन्यांनंतर माझ्याकडे खेळाडूच नसतील असं धोनी हसत हसत म्हणाला. त्यानंतर आयपीएलमध्ये षटकारांचं प्रमाण वाढतंय हे बोलताना स्टेडियमबाहेर बॉल गेल्यास आयपीएलमध्ये दोन धावा जादा द्यायला हव्यात असं उपहासात्मक विधान धोनीने केलं. तुला दबाव जाणवत नाही का, मैदानावर तू व्यक्त होत नाही असा प्रश्न हर्षा भोगलेने विचारला, त्यावर मी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन व्यक्त होत असतो आणि मला देखील दबाव जाणवतो असं धोनी म्हणाला.

कोलकाता नाईट रायडर्सने विजयासाठी दिलेले २०३ धावांचे दिलेले कठीण लक्ष्य चेन्नई सुपर किंग्जने १९.५ षटकांत ५ गडी गमावून गाठले. त्यांच्याकडून सॅम बिलिंग्जने सर्वाधिक २३ चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह ५६ धावा केल्या. शेन वॉटसनने १९ चेंडूंत ३ चौकार, ३ षटकारांसह ४२, अम्बाती रायुडूने २६ चेंडूंत ३ चौकार, २ षटकारांसह ३९, आणि धोनीने २८ चेंडूंत २५ धावा केल्या. कोलकाता नाईट रायडर्सकडून टॉम कुरेनने २ गडी बाद केले. तत्पूर्वी, आंद्रे रसेलच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सने ६ बाद २०२ धावा फटकावल्या.