रेल्वे स्थानकांवर हमालांकडून मनमानी शुल्क आकारण्याला आळा बसावा आणि स्थानकावर उतरल्यानंतर हमाल शोधावा लागू नये यासाठी मध्य रेल्वेने तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं ठरवलं आहे. हमालांकडून मनमानी शुल्क आकरण्याच्या अनेक तक्रारी येत असल्याने मध्य रेल्वेने हमालांची ऑनलाईन बुकिंग करणारी सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार मोबाइल अॅपद्वारे हमालांचं बुकींग करता येणार आहे.

हमालांची ऑनलाइन बुकिंग करता यावी यासाठी मध्य रेल्वेकडून ‘यात्री’ नावाचं अॅप विकसीत केलं जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हिजनमध्ये एकूण 300 हमाल असून त्या सर्वांना या अॅपशी जोडले जाणार आहे. यानुसार, प्रत्येक हमालाकडे बायोमॅट्रीक कार्ड देण्यात येणार आहे. केवळ नोंदणीकृत हमालांनाच हे काम मिळावं म्हणून हे कार्ड देण्यात येत असल्याचं रेल्वे प्रशासनाने सांगितलं. ओला-उबरच्या धर्तीवर हे अॅप तयार करण्यात येणार आहे. त्यात सामान कुठपर्यंत वाहून न्यायचं, त्याची संख्या आणि वजन याबाबतची माहिती विचारून शुल्क आकारण्यात येणार आहे.

अनेकदा हमाल म्हणून नोंद नसतानाही बरीच बाहेरची मुलं सामान वाहून खोटे हमाल बनून नेण्याचं काम करतात. याशिवाय रेल्वे स्थानकांवर अनेक हमाल मनमानी पद्धतीने प्रवाशांकडून शुल्क आकारतात, तर अनेकदा रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर हमाल सापडतच नाही. या सर्व बाबींवर उपाय म्हणून मध्य रेल्वेने मोबाइल अॅपवरून हमालांची बुकींग सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.