डॉक्टर्स डेच्या दिवशीच मुंबईतील एका महिला डॉक्टरचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत ही महिला डॉक्टर चक्क पीपीई किट घालून नाच करताना दिसत होती. या व्हिडीओला सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्धी मिळाली. या महिला डॉक्टरचं नाव डॉ. रिचा नेगी असून ती मुंबईतलीच आहे. आपण असं का केलं यामागचं कारण आता डॉ. रिचाने सांगितलं आहे.

रिचा म्हणते, “तो व्हिडीओ अत्यंत उत्साहाच्या भरात केला होता. त्यादिवशी डॉक्टर्स डे होता. मला रात्री २ वाजेपर्यंत शिफ्ट होती.. त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीशी लाइव्ह व्हिडीओबाबत बोलले. तिला मी सांगितलं की मला एक लाइव्ह व्हिडीओ करावासा वाटतोय. तिच्याशी बोलल्यानंतर मला सुचलं की पीपीई सूट घालूनच डान्स करावा. हा व्हिडीओ शूट करण्याच्या आधी १५ मिनिटं आधी मला गर्मी हे गाणं आठवलं कारण जेव्हा आम्ही हा सूट घालतो तेव्हा घामाच्या धारा लागतात. त्यामुळेच मी गर्मी या गाण्यावर डान्स केला. करोनाशी लढणाऱ्या सगळ्या डॉक्टरांना सलाम करण्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न होता” असंही तिने सांगितलं. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत तिने हे वक्तव्य केलं आहे.

१ जुलै अर्थात डॉक्टर्स डेच्या दिवशी डॉ. रिचा नेगीने पीपीई किट घालून केलेला हा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट ठरला. पीपीई किट घालून आम्ही जे सहन करतोय त्या परिस्थितीत आम्ही नकारात्मकतेलाच तोंड देतो आहोत. या डान्सद्वारे मी ती नकारात्मकता दूर ठेवण्याचा प्रयत्न करते आहे असं रिचाने त्यावेळच्या मेसेजमध्ये म्हटलं होतं. रिचाने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ती पीपीई कीट घालून ‘स्ट्रीट डान्सर’ या चित्रपटातील ‘हाय गर्मी’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. रिचाने हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर अभिनेता वरुण धवननेही तिच्या पोस्टवर कमेंट करत तू खरंच खूप सुंदर नाच करतेस असं म्हटलं होतं. आता रिचाने नेमकं पीपीई किट घालून डान्स करण्यामागचं कारण समोर आणलं आहे.