सोशल मीडियामुळे फ्रॉड किंवा फसवणूक झाल्याच्या किंवा त्याहून गंभीर घटना घडल्याच्या अनेक बातम्या कानावर येत असतात. पण सोशल मीडियाचे जितके तोटे आहेत तितकेच फायदेही असल्याचं अनेकदा समोर आलंय. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर दिल्लीतील ‘बाबा का ढाबा’ला मिळालेली प्रसिद्धी तुमच्या लक्षात असेलच. त्यानंतर नेटकऱ्यांनी अशाप्रकारच्या अनेक गरजू लोकांसाठी मदतीचं आवाहन करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून अशा अनेक गरजू व्यक्तींच्या व्यथा समोर येत आहेत.

अशीच एक व्यथा आहे मुंबईच्या राकेश नावाच्या व्यक्तीची. राकेश यांच्याबाबत आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी एक पोस्ट ट्विटरवर शेअर केली आहे. राकेश हे मुंबईच्या अंधेरी परिसरात जुन्या पुस्तकांचं एक छोटंसं दुकान चालवतात. त्यांच्या दुकानातून अवघे १० रुपये देऊन कोणीही कोणतंही पुस्तक वाचण्यासाठी भाड्यावर घेऊन जाऊ शकतं. “लोकं त्यांची आवड पूर्ण करण्यासाठी पैसे कमावतात पण राकेश यांना वाचनाची आवड आहे आणि पैसे खर्च न करता ते त्यांची आवड पूर्ण करतायेत”, असं शरण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय. राकेश यांना डावा हात नाहीये, पण त्यामुळेही ते निराश किंवा उदास होत नाहीत तर पुस्तकांतून शिकण्याचा प्रयत्न करतात.

Storypick च्या एका रिपोर्टनुसार, लॉकडाऊनमध्ये काही लोकांनी राकेशची मदत करण्याची इच्छाही व्यक्त केली होती. पण राकेश यांनी मदत घेण्यास नकार दिला.


दरम्यान, शरण यांनी राकेश यांचा फोटो आणि पोस्ट शेअर केल्यापासून सोशल मीडियावर ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. नेटकरी विविध प्रतिक्रिया देत राकेश यांचं तोंडभरुन कौतुक करतायेत. १० रुपयांमध्ये पुस्तकं भाड्याने देणाऱ्या राकेशने आयुष्यभराचा धडा शिकवला, अशाप्रकारच्या बोलक्या प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.