भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला मुंबई पोलिसांनी एक गुन्हा माफ केला आहे. हा गुन्हा आहे मर्यादेपेक्षा जास्त वेगाने जाण्याचा. मुंबई पोलिसांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर लिहिलं आहे की, ‘येथे कोणतंही ओव्हरस्पिडिंग चलन लागणार नाही. खूप साऱ्या शुभेच्छा. तुमच्या नव्या कामगिरीसाठी अभिनंदन’. मुंबई पोलिसांनी विराट कोहलीला ट्विट करत त्याचा फोटोही अपलोड केला आहे. फोटोत विराट कोहली वेस्ट इंडिजविरोधात शतक लगावल्यानंतर सेलिब्रेशन करताना दिसत आहे.

तुमच्या माहितीसाठी, विराट कोहलीने बुधवारी विशाखापट्टणम येथे वेस्ट इंडिजविरोधातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 157 धावांची जबरदस्त खेळी केल्यानंतर मुंबई पोलिसांनी हे ट्विट केलं आहे. यासोबतच विराट कोहलीने 10 हजार धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आपलं नाव नोंदवलं आहे. कोहलीने फक्त 129 चेंडूत 157 धावांची स्फोटक खेळी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात 140 धावा करत विराटने संघाला विजयी सुरुवात करुन दिली होती.

मुंबई पोलिसांचं हे ट्विट युजर्सना प्रचंड आवडलं असून अनेकांनी रिट्वीट आणि शेअर केलं आहे.

दुसऱ्या सामन्यात विराटने 157 धावा करुनही भारतीय संघ सामना जिंकू शकला नाही. भारताने सहा गडी गमावत 321 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजला शेवटच्या ओव्हरमध्ये 14 धावा तर शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. होपने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत सामना अनिर्णित राहिला.